Pimpri : ‘केसरी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

एमपीसी न्यूज – ‘केसरी – saffron’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. कुस्ती या मातीतील खेळाभोवती फिरणाऱ्या केसरी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. केसरी या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाकेने केले आहे.

केसरी – saffron या चित्रपटातून मूळचा कोल्हापूरचा असलेला विराट मडके चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर अभिनेते महेश मांजरेकर वस्तादाच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी यांच्यासह प्रविण तरडे, उमेश जगताप, छाया कदम, जयवंत वाडकर, नंदेश उमप, नचिकेत पूर्णपात्रे, सत्यप्पा मोरे, ज्ञानरत्न अहिवळे, रूपा बोरगावकर, पद्मनाभ बिंड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ट्रेलर मध्ये ही कथा एका सामान्य मुलाची संघर्षगाथा असल्याचे दिसते. चित्रपटाच्या नायकाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र त्याच्या कुस्ती खेळण्यास वडिलांचा विरोध आहे. काही कारणांनी गावातील लोक सुद्धा त्याच्या विरोधात असल्याचे दिसते

सिनेमाचा नायक, खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा असेल तेव्हाच घरात पाउल टाकीन अशी  शपथ घेऊन घराबाहेर पडतो. एका  सामान्य घरातील मुलगा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार का? आणि ते ध्येय मिळवण्यासाठी तो काय आणि कशी मेहनत घेतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. सगळ्याच कलाकारांच्या अफलातून भूमिका असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे लेखन नियाज मुजावर यांनी केले असून संकलन आणि दिग्दर्शन सुजय डहाकेचे आहे तर संतोष रामचंदानी आणि सह निर्माता मनोहर रामचंदानी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

इंटरनेटवर सध्या केसरीचा ट्रेलर धुमाकूळ घालत असून येत्या २८ फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा चित्रपट बघायला मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.