Pimpri : देशात प्रथमच गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन होत आहे. या स्पर्धा शनिवार  25 आणि रविवार 26 रोजी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे होणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सचिव बाळकृष्ण खंडागळे, खजिनदार किशोर गुजर, प्रोजेक्ट हेड शंतनू साळवेकर, क्रीडा डायरेक्टर गणेश कुदळे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, प्रसाद गणफुले, दीपेन समर्थ, अभिजित तावे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवारी सकाळी 10 वाजता होणार असून उद्घाटन समारंभासाठी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार आहेत. देशात प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली आणि भारताच्या अन्य भागातून सुमारे 325 स्वमग्न व गतिमंद मुले सहभाग घेणार आहेत. महाराष्ट्रातून या स्पर्धेत 64 स्पर्धक सहभाग घेत आहेत. सर्व स्पर्धकांची राहण्यसह सर्व सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा आणि दुपारी अडीच ते रात्री साडेसात या वेळेत पोहण्याच्या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता उपस्थितांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवारी सकाळी साडेसात ते दुपारी बारा या वेळेत स्पर्धा होणार आहेत. तर दुपारी दोन ते चार या वेळेत पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. सर्वसाधारण मुलांचे खेळ पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुडुंब गर्दी झालेली सर्रास पाहायला मिळते. त्याचप्रमाणे स्वमग्न व गतिमंद मुलांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.