Nigdi : जबरदस्तीने मोबाईल हिसकावणा-यांना प्रतिकार करणाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षातून जात असताना दुसऱ्या एका रिक्षातून आलेल्या तीन जणांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचा मोबाईल धारकाने प्रतिकार केला. यावरून तीन चोरट्यांनी मोबाईल धारकास मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुर्गानगर चौक निगडी येथे घडली.

दत्तात्रय वसंत धनके (वय 32, रा. देहुगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी फिर्यादी दत्तात्रय दुपारी सव्वा तीनच्या सुमारास दुर्गानगर चौक येथून भोसरीकडे शेअर रिक्षातून जात होते. रिक्षात बसल्यानंतर दत्तात्रय यांनी त्यांचा मोबाईल हातात पकडला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका रिक्षातील तीन जणांनी दत्तात्रय यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दत्तात्रय यांनी मोबाईल घट्ट पकडला असल्यामुळे चोरट्यांना त्यांचा मोबाईल हिसकावता आला नाही. या कारणावरून चोरट्यांनी रिक्षा थांबवून दत्तात्रय यांना जबरदस्तीने रिक्षातून खाली उतरवले. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. यामध्ये दत्तात्रय जखमी झाले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.