Ajit Jogi Passed Away: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

Former Chief minister of Chhattisgarh Ajit Jogi passed away

एमपीसी न्यूज- छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री व जनता काँग्रेस छत्तीसगडचे संस्थापक अध्यक्ष अजित जोगी (वय 74) यांचे आज दुपारी रायपूर येथील रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.  उद्या (शनिवारी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने 9 मेला रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. उपचारांच्या दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. अजित जोगी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्वीट वरुन दिली आहे.

अजित जोगी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. अजित जोगी यांना लोकसेवा करण्याचा छंद होता. या प्रेमापायी त्यांनी नोकरशहा आणि राजकीय नेत्याच्या रुपात अपार मेहनत घेतली. विशेष करुन आदिवासी समाजातील लोकांच्या आयुष्यात बदल व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

अजित जोगी यांचा जन्म 29 एप्रिल 1946 रोजी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे सामान्य कुटुंबात झाला. अजित जोगी लहानपणापासून प्रतिभावान होते. अभ्यासात नेहमीच पुढे असायचे. 1968 मध्ये त्यांनी मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी, भोपाळकडून अभियांत्रिकी शाखेची पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात जोगी यांची त्यांच्या विभागातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

1967 मध्ये प्रशासन अभियंता महाविद्यालय, रायपूर (छत्तीसगड) मध्ये प्राध्यापक (1967-68) कार्यरत होते. 1974 मध्ये अजित जोगी यांची भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. 1974 ते 1986 पर्यंत मध्य प्रदेशातील सिधी, शाहडोल, रायपूर आणि इंदौर जिल्ह्यांमध्ये 12 वर्षे सेवा करुन सर्वात जास्त काळ सेवा देणारे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद आहे.

अजित जोगी यांनी 1988 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केले. छत्तीसगडच्या निर्मितीनंतर त्यांनी 2000-2003 या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. दरम्यान, 2016 मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगड असा आपला पक्ष स्थापन केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.