Shirur News : शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- अजित पवार

एमपीसी न्यूज : शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकूण 25 कोटी रुपयांची तरतूद करणार असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष वैशाली वाखारे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शिरुरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीमधून कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामे व्हावी. प्रत्येक निर्णय शहराच्या विकासाला चालना देणारा असला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेवून शिरुर नगरीचा विकास करावा.

नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेवून प्रशासनाला सहकार्य करायला हवे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरीकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्य प्रकारे विचार करण्यात येईल. पुणे ते शिरुर रस्त्याचे दुमजली कामासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावून विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.