Pimpri News : डॉ. नंदकिशोर कपोते यांना ‘भारतज्योती प्रतिभा सन्मान एक्सलंस’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – प्रसिध्द कथक नर्तक डॉ. पं.नंदकिशोर विमल भास्कर कपोते यांना राज्यस्तरीय भारतज्योती प्रतिभा सन्मान एक्सलंस पुरस्कार 2021 देऊन सन्मानित करण्यात आले. कथक नृत्यातील 45 वर्षांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्यावतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद 2021 आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले . रविवारी (दि.26) ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. विजय कुमार शहा व अकादमीचे अध्यक्ष ॲड. कृष्णाजी जगदाळे उपस्थित होते.डॉ. नंदकिशोर कपोते यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2004, महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार 2010, पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार 2014 हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दिल्ली दूरदर्शनचे ‘ए’ ग्रेडचे कलाकार असून कथक नृत्यात पी.एच.डी, डॉक्टरेट मिळवणारे डॉ.कपोते महाराष्ट्रातील पहिले कथक नर्तक आहेत. नुकतीच डॉ.कपोते यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे सिनियर फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ही त्यांच्या कार्याची नोंद झाली आहे.

डॉ. नंदकिशोर कपोते पं.बिरजू महाराजांचे पट्टशिष्य असून यांनी संपूर्ण भारतात तसेच परदेशातही जपान, रशिया, अमेरिका, हॉलंड, कुवेत अशा अनेक देशात कथक नृत्याचे कार्यक्रम सादर केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.