Talegaon Dabhade News : गॅसदाहिनीच्या सिलेंडरमधील गॅस अचानक संपल्याने अंत्यसंस्कार अर्धवट

नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाटयावर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेच्या स्मशानभूमीतील गॅसदाहिनीच्या सिलेंडरमधील गॅस अचानक संपल्याने अंत्यसंस्कार करण्यात येत असलेला मृतदेह अर्धवट अवस्थेत  तसाच सुमारे दीड ते दोन तास दुसरा गॅस सिलेंडर येईपर्यत गॅस दाहिनीत पडून राहिला. यामुळे नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला.

मंगळवारी (दि 30) रात्री दहाच्या सुमारास कोरोना रूग्णांचा मृतदेह येथील गँस दाहिनीमध्ये अत्यसंस्कार करण्यासाठी आला होता.

अग्निसंस्कार चालू असतानाच गॅस दाहिनीतील सिलिंडरमधील गॅस संपला.त्यामुळे तेथील  कर्मचा-यांची एकच पळापळ झाली. अखेर दोन तासाने ठेकेदाराने सिलिंडर पाठविले. तसेच जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी देखील सामाजिक बांधिलकीतून सिलिंडर पाठवून दिले व अंत्यसंस्कार पूर्ण झाले.

या घटनेचे वृत्त वा-यासारखे शहर परिसरात पसरले. मृताचे नातेवाईक, मित्र परिवार, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या ढिसाळ  कारभाराबाबत  प्रचंड संताप व्यक्त करून नगर परिषदेकडे तक्रार केली.

हा विषय नगर परिषदेच्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, गणेश खांडगे, आरोग्य सभापती किशोर भेगडे, गटनेत्या सुलोचना आवारे  यांच्यासह नगरसेवकांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,  प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, मयूर मिसाळ यांना ढिसाळ कारभारावरून धारेवर धरले. तसेच ठेकेदारावर तातडीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.