Talegaon-Dabhade : ‘गाढवाचं लग्न’ फेम प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या (Talegaon-Dabhade) जन्मशताब्दी निमित्त ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला. तसेच विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानचॆ उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले.

हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.16)  रोजी सायंकाळी 6 वाजता तळेगाव दाभाडे येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.6 (गुलाबी शाळा) येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्य़क्ष म्हणून प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, विशेष निमंत्रित अभिनेत्री सविता मालपेकर, जेष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, लावणी कलावंत अर्चना जावळेकर व संगीता लाखे आदी उपस्थित होते.

यावेळी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील एक प्रसंग मंचावर सादर केला, मोहन जोशी यांनीही त्यांना साथ दिली आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाट झाला आणि एकच हशा पिकला.

“पठ्ठे बापूराव नंतर कोणी तमाशा कलावंत असेल तर ते दादू इंदुरीकर आहे असे मत जेष्ठ लेखक प्रभाकर ओव्हाळ यांनी व्यक्त केले, तसेच “गाढवाचं लग्न” या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु करणार असल्याचे सविता मालपेकर यांनी सांगितले.

Pimpri News : बीआरटी बस थांब्यांसाठी उधळपट्टी सुरूच

याबरोबरच विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे, कार्याध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे येथील अध्यक्ष यांची सुरेश धोत्रे, उपाध्यक्षपदी मुंबई विद्यापीठ लोककला अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे व सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, सचिवपदी साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सहसचिवपदी साहित्यिक सोपान खुडे, खजिनदारपदी तळेगाव दाभाडे नगर परिषद माजी नगराध्यक्षा ॲड.रंजना भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विश्वस्तमंडळात कांदबरीकार विश्वास पाटील, डॉ.भावार्थ देखणे, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, खंडूराज गायकवाड, साहेबराव काशीद, दादू इंदुरीकर यांचे चिरंजीव राजॆद्र सरोदे यांची निवड करण्यात आली.

प्रतिष्ठानच्या उद्घाटनानंतर उपस्थित प्रेक्षकांना रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर व सहकारी यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा लावणीचा बहारदार कार्यक्रम पाहायला मिळाला.

विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने राज्य पातळीवर लोककला विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच लोककलेसाठी परिषद तसेच संमेलन भरवली जाणार आहेत. लोककलेचा जास्तीत जास्त प्रसार या माध्यमातून केला जाणार आहे. लोककलावंत विशेषतः महिला कलांवतांसाठी सोयी-सुविधा मिळवण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

लोककलेचे संवर्धन व प्रसार व्हावा, यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच दादू इंदुरीकर जन्मशताब्दीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत (Talegaon Dabhade) विवध उपक्रम राबविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी संस्थेमार्फत शासनाकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश खांडगे यांनी दिली.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी नियोजनाचे काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे विश्वस्त सुरेश साखवळकर, संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, उपाध्यक्ष ब्रिजेंद्र किल्लावाला, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे सहकार्यवाह हरिश्चंद्र गडसिंग, सचिव प्रसाद मुंगी, खजिनदार नितीन शहा व सहखजिनदार भरतकुमार छाजेड, कैलास केदारी तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.