Pimpri : भुईभाडे शुल्कवाढीचा निषेधार्थ गणेश मूर्ती विक्रेत्यांचा बंद 

एमपीसी न्यूज –  प्रदूषण निर्मूलन शुल्काच्या नावाखाली महापालिकेने गणेश मूर्ती विक्री स्टॉल्ससाठी भुईभाड्यामध्ये केलेली सहापट वाढ कमी करण्याची विक्रेत्यांची मागणी असताना प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या शहरातील विविध भागातील विक्रेत्यांनी आज (बुधवारी) दिवसभराचा बंद पाळून महापालिकेचा निषेध केला. 

गणेश मूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांकडून शहरात तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात दरवर्षी शेकडो स्टॉल्स उभारले जातात. महापालिकेकडून स्टॉल्सला परवानगी देताना भुईभाडे आकारले जाते. गतवर्षी एक हजार रुपये भुईभाडे अधिक जीएसटी (वस्तू व सेवा कर) असे परवाना शुल्क महापालिकेने आकारले होते. त्यामुळे अधिकृतपणे परवाना घेऊन स्टॉल्स उभारणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, यंदा महापालिकेने अचानकपणे सहापटीने भुईभाडे वाढविले आहे. स्टॉल्स उभारणीच्या खर्चात यंदा पंधरा टक्के वाढ झाली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस व रंगातील दरवाढीमुळे गणेश मूर्तीच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली आहे. त्यात महापालिकेने भुईभाडे म्हणून दीड हजार, प्रदूषण निर्मूलन शुल्काच्या नावाखाली साडेचार हजार रुपये आणि त्यावर अठरा टक्के जीएसटी असे एकूण मिळून सहापटीने वाढ केली आहे. त्यामुळे गणेश मूर्ती विक्रेते हवालदिल झाले आहेत.

कोणतीही पूर्वकल्पना न देता स्टॉल्सचा परवाना घेण्यासाठी जाणाऱ्यांना दरवाढीची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. शुल्क कमी करण्याची मागणी विक्रेत्यांकडून होत आहे. कुंभार समाज संघटना तसेच शहरातील विविध भागातील विक्रेता संघटनांकडून याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दाद दिली नाही. उलट ह क्षेत्रीय कार्यालयाकडील काही अधिकारी व कर्मचारी पिंपरीगावात कारवाईसाठी आले. त्यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पिंपरीगावसह, संत तुकारामनगर, थेरगाव, डांगे चौक, चिखली, रामनगर, कासारवाडी आदी भागातील विक्रेत्यांनी विक्री बंद केली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेत शुल्क कमी करण्याची व कारवाई न करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आयुक्त आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने शिष्टमंडळाने महापौर जाधव यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. त्यावर महापौरांनी प्रशासनासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. उद्या (गुरुवारी) याबाबत बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी विक्री स्टॉल्स खुले करण्यात आले.

शिष्टमंडळात विनायक मुरादे, सागर जाधव, ललित शहा, अनिल तुरुक, शंकर कुंभार, प्रशांत पिसे, अमित कलापुरे, बालाजी भालेकर, बाळू कुंभार, बापू कुंभार, ओम कुंभार, रामचंद्र करकटकर, शंकर राजे आदींचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.