Pimpri: शहरात ‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही; खबरदारीसाठी ‘वायसीएम’मध्ये दहा खाटांची सुविधा

'कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज; महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सात खासगी रुग्णालयात 48 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहेत. भोसरीतील रुग्णालय देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. ‘कोरोना’चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार असून शहरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे उपस्थित होते.

महापालिका हद्दीत आपत्ती व्यस्थापन शिष्टचर लागू करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूची माहिती देण्यासाठी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांची समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.