PCMC News : शहरातील गणेश मंडळांनी राज्य सरकारच्या सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात  येणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत-जास्त गणेस मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

यासाठी मंडळांना शुक्रवार (दि.2) पर्यंत अर्ज करता येणार आहेत.यासाठी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून 3 विजेते राज्यस्तरीय समितीकडून घोषित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना 5 लाख रुपये, व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यास अडीच लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन शासनाकडून गौरव होणार आहे.त्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी अर्ज भरुन    [email protected]  या  ईमेलवर ऑनलाईन पाठवावेत.

स्पर्धेच्या अटी –

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. पुरस्कारासाठी निवड काही निकषाच्या आधारे करण्यात येणार आहे. सहभागी झालेल्या मंडळांना शासननिर्णयानुसार ठरवलेल्या बाबींची पूर्तता केल्यास एकूण 150  गुणांपैकी गुण दिले जातील.यामध्ये पर्यावरणपुरक मूर्ती, पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा अशा प्रकाच्या समाज प्रबोधन विषयावर किंवा  स्वांतत्र्याच्या चळवळीसंदर्भातील देखावा आणि सजावट, रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर इत्यादी कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक,आरोग्य,सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधांमध्ये पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त आदी बाबींचा समावेश आहे.

गणेश मंडळांना अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर तसेच पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर किंवा दर्शनिका विभागाच्या  https://mahagazetteers.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. हा अर्ज आणि सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

निवड समिती गणेशोत्सव उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील. व्हिडीओ व आवश्यक कागदपत्र गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करुन घेतील. ही समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत गुणांकन करुन त्यातील एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांच्या संबंधित कागदपत्रांसह व्हिडीओ व गुणांकन राज्य समितीकडे  सादर करणार आहेत. तसेच राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 याप्रमाणे 36 प्राप्त शिफारशीत 3 विजेते गणेशोत्सव मंडळ वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळांनाही  राज्य शासनाच्या वतीने  25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा बक्षीस वितरणाचा समारंभाचा दिनांक व ठिकाण याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.