Crime News : गुंडाची अजब दहशत,तडीपारीचा खर्च म्हणून खंडणी मागत व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज – माझ्या तडीपारीत दहा लाख रुपये खर्च झाला आहे तो मला दे म्हणत चाकण येथे एका हॉटेल व्यावसायिकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.30) मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान खंडोबामाळ येथे घडला आहे.

असिफ युसुफ शेख (वय 39 रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलिसांनी किरण सुदाम गोतारणे (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचे साथीदार मयूर मेटे (वय 30), नवनाथ शरद गोरे (वय 32) सर्व राहणार चाकण यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक आहेत.मंगळवारी रात्री फिर्यादी व त्यांचे साथीदार मंगेश तुकाराम शिंदे (वय 42) हे घरी जात असताना आरोपी तेथे आले व त्यांनी मंगेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मंगशे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केले, फिर्यादी यांनी मध्ये पडून मंगेश यांना सोडवले असता आरोपी किरण म्हणाला की, माझ्या तडिपारीमध्ये लय खर्च झालाय, मला दहा लाख रुपये दे त्यातील एक लाख आत्ताच्या आत्ता मला पाहिजे, अशी मागणी केली.यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला. याचा राग येऊन आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीलाही डोक्यात लोखंडी रॉडने मारून आरोपी नवनाथ गोरे याने रुमालाने गळा आवळून फिर्यादीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण परिसरात व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.