Pune Corona News : दिलासादायक बातमी ! पुणे शहरात प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत घट

0

एमपीसीन्यूज : शहरातील कोरोना रुग्ण संख़्या वाढत असतानाच सोसायटीत 20 पेक्षा अधिक आणि इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाबाधित असलेल्या इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जात आहेत. मागील सलग तीन आठवडे शहरात प्रत्येक आठवड्याला नव्याने 100 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची वाढ होत होती. मात्र, आता शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची वाढ मंदावली असून शहरात सध्या 497 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

शहरात 10 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली. त्यानंतर शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शहरातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. परिणामी शहरात रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेकडून रुग्ण आढळलेला भाग बंद न ठेवता, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने शहरातील मोठमोठ्या आणि नामांकित सोसायट्यांचा समावेश आहे.

शहरात 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक करोना रुग्ण सौम्य लक्षणे असलेले अथवा लक्षणे नसलेले होते. त्यामुळे ते घरीच विलगीकरणात राहात होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच असल्याने, तसेच विलगीकरणातील रुग्ण बाहेर पडत असल्याने त्यांच्याकडून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे समोर आले.

_MPC_DIR_MPU_II

16 एप्रिलअखेर सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्राची संख्या 497 होती. तर त्यापूर्वी सलग तीन आठवडे ही क्षेत्रांची संख्या आठवड्याला 100 ने वाढत होती. मात्र, 17 एप्रिलपासून नवीन कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून बाधितांचा आकडाही उतरणीला लागला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रातील रूग्ण बरे होत आहेत, तो भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येत आहे. परिणामी, शहरात आता 492 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

औंधमध्ये सर्वाधिक, तर कोंढवा-येवलेवाडीत सर्वांत कमी प्रतिबंधित क्षेत्र

शहरात सर्वाधिक 78 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर भागात आहेत. सुरुवातीला तीन आठवडे या भागात सर्वाधिक क्षेत्र होती. त्यानंतर मागील दोन आठवडे सहकारनगर-धनकवडी परिसर आघाडीवर होता. तर आता धनकवडी-सहकार नगर तिसऱ्या क्रमांकावर असून या भागात 57 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

तर दुसऱ्या क्रमांकावर वारजे-कर्वेनगरचा परिसर असून या भागात 68 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर सर्वांत कमी 8 प्रतिबंधित क्षेत्र कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असून उर्वरित 10 क्षेत्रीय कार्यालयांत 50 पेक्षा कमी प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment