Hadapsar: डॉ. सुदाम काटे यांना ‘पद्मश्री’

एमपीसी न्यूज – हडपसर येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे डॉ. सुदाम काटे यांच्या कार्याचा ‘पद्मश्री’ किताबाने गौरव करण्यात आला आहे. सिकल सेल अ‍ॅनिमिया आजाराच्या संशोधनामध्ये डॉ. काटे यांनी स्वतःला झोकून दिले आहे.

साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनी म्हणजे ११ जून १९६० रोजी हडपसर येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाने डॉ. सु. ल. तथा सुदाम काटे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. डॉ. दादा गुजर यांच्यासमवेत काटे नंदुरबार तालुक्यातील धडगाव येथे गेले आणि आदिवासींच्या समस्या पाहून त्यांनी सिकल सेल विकारावर काम करण्याचा निर्णय घेतला.

सिकल सेल अ‍ॅनिमिया म्हणजे नेमका आजार का होतो, कसा होतो, कोठे मोठ्या प्रमाणात आढळतो, त्यावर औषधांनी मात कशी करता येईल याबाबत डॉ. काटे यांचे सातत्याने संशोधन सुरू असते.

सिकल सेल हा आनुवांशिक रक्तदोष आहे. हा आजार जनुकीय दोषांमुळे होतो. रुग्णांच्या मरणप्राय यातना पाहून गुजर आणि काटे यांनी वैद्य य. गो. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदशास्त्रातील वनस्पतींपासून औषधे तयार केली. डॉ. काटे आजही रुग्णसेवेत अविरत कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.