Pune: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच तो अतिशय रंजकपणे सांगण्याची कला आहे. तरुण पिढीच्या रक्तात शिवचरित्र भिनवण्याची फार मोठी कामगिरी पुरंदरे यांनी केली. बाबासाहेब पुरंदरेंना शिवशाहीर म्हणून संबोधले जाते. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती करून त्याचे देशभर प्रयोग केले.

_MPC_DIR_MPU_II

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी.दांडेकर यांच्याशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य आहे.

शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा सचित्र ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती निघाल्या असून आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.

प्रणव मुखर्जी- भारतरत्न पुरस्कार.
भुपेन हजारीका-भारतरत्न पुरस्कार.
नानाजी देशमुख-भारतरत्न पुरस्कार.
बाबासाहेब पुरंदरे-पद्मविभूषण पुरस्कार.
डॉ.अशोक कुकडे-पद्मविभूषण पुरस्कार.
अनिलकुमार नाईक पद्मविभूषण पुरस्कार.
मनोज वाजपेयी- पद्मश्री पुरस्कार.
गौतम गंभीर-पद्मश्री पुरस्कार.
कादरखान – पद्मश्री पुरस्कार.
वामन केंद्रे- पद्मश्री पुरस्कार.
शिवमनी – पद्मश्री पुरस्कार.
प्रभुदेवा- पद्मश्री पुरस्कार.
डॉ.रवींद्र कोल्हे व डॉ.स्मिता कोल्हे-पद्मश्री पुरस्कार.
शब्बीर सय्यद- पद्मश्री पुरस्कार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.