Pune News : आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं म्हणून त्याने घर सोडले होते, 13 वर्षांनी लागला शोध

एमपीसी न्यूज : आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचे म्हणून त्याने तेरा वर्षांपूर्वी घर सोडलं होतं. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. मात्र लोहमार्ग पोलिसांनी तब्बल तेरा वर्षानंतर या तरुणाचा शोध लावला आणि सुखरूप कुटुंबियांच्या ताब्यात सोपवले. लोहमार्ग पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहिमेत हा तरुण सुरतमध्ये काम करत असल्याचे आढळले. तेरा वर्षानंतर भेटलेल्या या दोन्ही भावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. 

गणेश मंनूलाल यादव (वय 32, हिनोतीया भाई, ता. बरेली, जी जबलपूर, मध्यप्रदेश) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आता 39 वर्षे वयाचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ एप्रिल 2008 रोजी गणेश आपल्या भावासोबत झेलम एक्सप्रेसने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान तो पुणे रेल्वे स्थानकावर उतरून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या भावाने लोहमार्ग पोलिसांकडे यासंबंधी तक्रार दिली होती. दरम्यान अनेक वर्षानंतर पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी मिसिंग व्यक्तीची माहिती एकत्र केली आणि तपासासाठी एक पथक नेमण्यात आले. या पथकाला गणेश हा सुरत येथील एका कंपनीत काम करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या भावाकडे सोपवले.

गणेश यादव यांच्या घरची गरिबी आहे. त्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे होते. त्यासाठी तो कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. घरी असलेले अठराविश्व दारिद्र्य आणि अल्प शिक्षण यामुळे बाळगलेले शिक्षण तो पूर्ण करू शकला नाही. त्यामुळेच त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.