Pune : शहरात पुन्हा धो-धो!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज सायंकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे स्टेशन, धनकवडी, कोथरूड, कर्वेनगर, वारजे – माळवाडी, बिबवेवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. पुण्यावर १२ किलोमीटर उंचीचे ढग तयार झाले असून, खालच्या स्तरात त्यांची घनता जास्त आहे. शहराच्या विविध भागांत तासाभरात मध्यम ते जास्त स्वरूपाच्या पाऊस पडला. 

या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती. पुणे विभागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला महाग झाला आहे. पण, पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाहीत. 5 नोव्हेंबर नंतर आणखी अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

सध्या पाऊस मुसळधार कोसळत आहे. फातिमानगरला ढगफुटी सारखा पाऊस कोसळत असल्याचे समजते. सहकारनगर (टांगेवला कॉलोनी) परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सदाशिव पेठ, डायस प्लॉट मार्केटयार्ड महर्षी नगरमध्ये पावसाचे पाणी साचले असून सदाशिव पेठेत वीज कोसळल्याचेही वृत्त आहे.

सायंकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची भंबेरी उडाली आहे. फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक घरी परतत असताना पावसाला सुरवात झाल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे स्टेशन, धनकवडी, कोथरूड, कर्वेनगर, वारजे-माळवाडी, बिबवेवाडी या भागांत जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.

सध्या नगर रस्ता, डेक्कन कॉलेज रस्ता, बंडगार्डन रस्ता, कृषी महाविद्यालय रस्ता ते संचेती हॉस्पिटल, स्वारगेट ते हडपसर रस्ता या मार्गाने जर तुम्ही प्रवास करत असाल, तर तुम्ही पर्यायी रस्ताचा वापर करू शकता. कारण या मार्गांवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे गुगल मॅपवर दिसत आहे.

तसेच आंबील ओढ्याला पुन्हा पूर आलेला असून ओढ्यालागतच्या गुरुराज सोसायटीमध्ये पुन्हा ओढ्याचे पाणी शिरले आहे. मागील महिन्यामध्ये 25 तारखेला झालेल्या पाऊसाची आठवण नागरिकांना झाली असून काळजाचा ठोका चुकलेले असल्याची भावना नागरिक वक्त करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वारंवार कोसळत असलेल्या पावसामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. त्यात पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरी कोसळत असून हा पाऊस 5 नोव्हेंबरपर्यंत शहरात मुक्कामाला राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.