Lonavala : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याकरिता हेरिटेज वॉक संपन्न

एमपीसी न्यूज – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मावळ तालुक्यातील गडकिल्ले व अति प्राचीन असलेल्या लेण्या या सर्व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, त्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा हक्कात नोंद व्हावी या करीता संपर्क बालग्राम संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाजे लेणी ते लोहगड किल्ला या वॉकमध्ये खासदार संभाजीराजे, अभिनेत्री गिरीजा ओक, मावळचे आमदार बाळा भेगडे, संपर्कचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, कमांडर श्रीनिवासन, नगर‍ाध्यक्षा सुरेखा जाधव, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, सरपंच चेतन मानकर, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांच्यासह सुमारे पाच ते सहा हजार नागरिक सहभागी झाले होते.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते भाजे गावात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेआठ वस्ता या हेरिटेज वॉकला सुरुवात करण्यात आली. तलवारबाजी व मर्दानी खेळाच्या साहसी प्रदर्शनाने सुरुवात झालेल्या या वॉकदरम्यान नागरिकांना महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती अनुभवायला व पाहायला मिळाली. यामध्ये जात्यावर दळण दळणाऱ्या महिला, तुळशी वृंदावनाला फेर धरून गाणी म्हणणार्‍या महिला, भजनकरी मंडळी, पोवाडे गाणारे शाहीर, वासुदेव, मल्लखांब यांच्यासह शिवकालिन शस्त्र प्रदर्शन व महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता. वॉकमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना मक्याचे कणीस, वडापाव, पिटलं भाकरी, मिरचीचा ठेचा असं मराठमोळा खाद्य देखील देण्यात आले होते.

यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले जग ज्या राज्यापुढे नतमस्तक होतं अशा छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशेपेक्षा अधिक किल्ल्यांपैकी एकाही किल्ल्याची नोंद ही जागतिक वारसा हक्कात नाही ही आपल्या करता दुर्दैवाची बाब असून प्रत्येक नागरिकाने या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्या करिता पुढाकार घ्यावा तसेच शासनाने देखील या वास्तूंचे जतन करण्याकरिता निधीची तरतुद करावी. सध्या महाराष्ट्रातील नऊ किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू असून भविष्यात सर्व किल्ल्यांचे संवर्धन करण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.