Chinchwad : तक्रार मागे घेण्यासाठी खंडणी मागणा-या महिलेला अटक

एमपीसी न्यूज – मारहाण आणि शिवीगाळीची तक्रार मागे घेण्यासाठी चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी दुपारी चिंचवड स्टेशन येथे घडली.

अनिता संजय भापकर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संदीप लक्ष्मण शेडगे (वय 38, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेडगे हे मोहननगर, चिंचवड येथील सुमीत प्रा. लि. या कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून कामाला होते. त्यावेळी तिथे साफसफाईचे काम करणाऱ्या अनिता या चोरी करीत असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक अर्जुन कांबळे यांना शेडगे यांनी दिली. यामुळे अनिता यांना कामावरून काढून टाकले. याचा राग अनिता यांच्या मनात होता.

28 ऑक्‍टोबर रोजी शेडगे हे काही कामानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथे गेले होते. त्यावेळी अनिता हिने शेडगे याने आपल्याला आनंदनगर, चिंचवड येथे मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार चिंचवड पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर शनिवारी (दि. 24) दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेडगे हे चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात असताना त्यांना अनिता यांनी फोन केला. चार हजार रुपये मला दिल्यास तुझ्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेते, असे म्हणत खंडणीची मागणी केली. यावरून शेडगे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या सूचनेनुसार फिर्यादी यांनी आरोपी अनिता हिला पैसे नेण्यासाठी बोलविले. ती पैसे नेण्यासाठी आली असता पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली. हा गुन्हा आणि आरोपी पिंपरी पोलिसांनी चिंचवड पोलिसांकडे वर्ग केला असून सहायक निरीक्षक शेवाळे याबाबत तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.