Hinjawadi : बहिणीचा खून करणाऱ्या भावाला आठ महिन्यानंतर अटक ; खून लपवण्यासाठी केला अपघाताचा बनाव

एमपीसी न्यूज- मालमत्तेच्या वादामधून सख्ख्या बहिणीचे डोके आपटून खून केला. त्यानंतर हा खून लपवण्यासाठी तिला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे भासवले. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना गाडीला आग लागून तिचा मृत्यू झाल्याचे भासवून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भावाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आठ महिन्यानंतर हा बनाव उघडकीस आला.

संगीता मनीष हिवाळे असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ जॉन डॅनियल बोर्डे (वय 40, रा. सौंदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) याला अटक करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीत हिवाळे या पतीबरोबर मतभेद झाल्यामुळे आपल्या मुलांसह आपला भाऊ जॉन यांच्याकडे राहत होत्या. 9 सप्टेंबर 2018 रोजी मालमतेच्या वादामधून रागाच्या भरामध्ये जॉन याने संगीताचे डोके फरशीवर जोरात आपटले. यामध्ये संगीताचा मृत्यू झाला. हा प्रकार लपवण्यासाठी तसेच बहिणीचे विम्याचे 30 लाख रुपये मिळावेत या हेतूने जॉन याने आपली आई आणि संगीताचा मुलगा सायमन याला घरी बोलावून घेतले. संगीताला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून तिला गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाऊ असे सांगितले.

त्याप्रमाणे संगीलाला गाडीतून घेऊन जात असताना कात्रज देहूरोड बायपासवर हॉटेल सयाजी जवळ गाडी बंद पडल्याचा बहाणा करून आई व सायमन याला गाडीतून खाली उतरवले. त्याला गाडीच्या बॉनेटसमोर उभे केले. दरम्यान आई लघुशंकेसाठी दूर गेल्याचे पाहून ही संधी साधत जॉन याने संगीताच्या अंगावर रॉकेल टाकून लायटरने मोटार पेटवून दिली. त्यानंतर मोटार शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचे भासवून खून लपवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी जॉन यानेच खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. अखेर आठ महिन्यानंतर हिंजवडी पोलिसांनी जॉन याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.