Hinjawadi : कट मारल्यावरून टेम्पो चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – गाडीला कट मारल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून टेम्पो चालकाला मारहाण केली. यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेबाराच्या सुमारास ताथवडे येथे इंदिरा कॉलेजच्या गेटसमोर घडली.

सिदाप्पा उचप्पा पुजारी (वय 28, रा. ताथवडे, ता. मुळशी) असे जखमी टेम्पो चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पुजारी टेम्पो चालवण्याचे काम करतात. मंगळवारी दुपारी ते देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून टेम्पो घेऊन जात होते. त्यावेळी दोनजण पुजारी यांच्याजवळ आले. ‘आमच्या गाडीला कट का मारला’ असे म्हणत दोघांनी पुजारी यांना लोखंडी टॉमीने मारहाण केली. यामध्ये पुजारी यांच्या पाठीवर, कमरेवर, पायावर गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.