Hinjawadi Crime News : दुसऱ्या लग्नाच्या ईरेला पेटलेल्या डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – डॉक्टर असलेल्या पतीला दुसरे लग्न करायचे असल्याने डॉक्टर पत्नीने त्याला ‘मला तुमच्या सोबत संसार करायचा नाही’ असे लिहून देण्याची मागणी केली. पत्नीने पतीच्या म्हणण्याप्रमाणे काहीही लिहून दिले नाही.

तसेच ती बहिणीसोबत नवी मुंबई येथून मुळशी तालुक्यातील सुस येथे माहेरी जात असताना पतीने तिला सुस येथे येऊन मारहाण करत तिच्यावर हल्ला केला. याबाबत डॉक्टर पतीवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनकर शेषेराव मस्के (वय 35, रा. नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर पतीचे नाव आहे. याबाबत पूनम दिनकर मस्के (वय 30, रा. सुस, ता. मुळशी. मूळ रा. नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी दोघेही पती-पत्नी असून ते डॉक्टर आहेत. आरोपी दिनकर याला दुसरे लग्न करायचे आहे. त्यावरून ‘तू मला सोडून दे. मला तुझ्या सोबत संसार करायचा नाही’ असे म्हणून पत्नीला शिवीगाळ केली. तसेच ‘मला तुमच्या सोबत संसार करायचा नाही’ असे दिनकर याला लिहून देण्याची त्याने मागणी केली.

‘लिहून दिले नाही तर संध्याकाळी कामावरून आल्यावर बघ मी काय करतो’ अशी धमकी देखील दिनकर याने पत्नीला दिली. त्यामुळे 4 मार्च रोजी फिर्यादी त्यांच्या बहिणीसोबत माहेरी येत होत्या. ही बाब दिनकरला समजली. त्याने ‘थांब तू आता. मी सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे. मी जेलमध्ये जायला तयार आहे’अशी फोनवरून फिर्यादी पत्नीला धमकी दिली.

फिर्यादी यांच्या माहेरी सुस येथील सोसायटीजवळ दिनकर थांबला. फिर्यादी आणि त्यांची बहीण कारमधून आल्या असता दिनकरने एक दगड कारच्या दिशेने भिरकावला. त्यात कारची काच फुटून फिर्यादी आणि त्यांची बहीण जखमी झाल्या. फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोके कारच्या दरवाजावर जोरजोरात आपटले. फिर्यादी यांच्या बहिणीने दिनकरला प्रतिकार केला असता त्याने फिर्यादी यांच्या बहिणीला मारहाण व शिवीगाळ केली.

‘मी आता सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे’ अशी धमकी त्याने दिली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूला गर्दी जमू लागल्याचे पाहून दिनकर तिथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.