Hinjawadi : फेसबुक इव्हेंट कॉर्डीनेटरने पळवला सव्वा लाखांचा ऐवज

एमपीसी न्यूज – फेसबुक इव्हेंट कॉर्डीनेटरने तरुणीचा विश्वास संपादन करून एक लाख 31 हजार 700 रुपयांचा ऐवज पळवून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास ओयो फ्लॅगशिप हॉटेल येथे घडली.

तापसी अनुप टंडन (वय 25, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई. मूळ रा. कानपुर, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुलसिंग प्रतापसिंग (रा. चंदिगढ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसी त्यांच्या कामानिमित्त मुंबईहून पुण्याला आल्या होत्या. त्या लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील ओयो फ्लॅगशिप हॉटेलमध्ये थांबल्या. गुरुवारी सकाळी आरोपी राहुलसिंग फेसबुक इव्हेंट कॉर्डीनेटर म्हणून हॉटेलमध्ये आला. त्याच्यासोबत गुरुवारी तापसी यांना काम करायचे होते. त्याला रूममध्ये बसवून तापसी अंघोळीसाठी गेल्या. त्यावेळी राहुलसिंग याने तापसी यांचे दागिने, रोकड आणि किमती साहित्य घेऊन पोबारा केला.

तापसी अंघोळ करून बाहेर आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. तसेच त्याने तापसी यांच्या डेबिट कार्डवरून 80 हजार रुपये काढून एकूण 1 लाख 31 हजार 700 रुपयांची चोरी केली. याबाबत तापसी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.