Hinjawadi : आईच्या मागे गेला अन हरवला; हिंजवडी पोलिसांनी घडवली माय-लेकराची भेट

एमपीसी न्यूज – आई कामावर जात असताना पाच वर्षांचा (Hinjawadi) चिमुकला नकळत आईच्या मागे गेला. रस्ता ओलांडताना अचानक आई दिसेनाशी झाली. अन तो चिमुकला कंपनीच्या गेटवर धाय मोकलून रडत बसला. इकडे आईला आपला मुलगा हरवल्याची कल्पना देखील नाही. मुलगा हरवल्याची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक सकुंडे यांनी दिवसभर प्रयत्न करत माय-लेकराची भेट घडवून दिली.

अभय रामू सिंह (वय 5) हा अंगणवाडीमध्ये शिकतो. त्याची आई शीतल हिंजवडी फेज एक येथील एका कंपनीत स्वयंपाकी म्हणून काम करते. दररोज शाळा सुटल्यानंतर आई, वडील येईपर्यंत अभय शेजाऱ्यांकडे बसत असे. मात्र रविवारी (दि. 23) त्याच्या शाळेला सुट्टी होती. आई कामावर जायला निघाली असता तिच्या नकळत अभय देखील आईच्या मागे निघाला. आई पुढे आणि काही अंतरावर अभय मागे चालत होता.

Pimpri : शहरातील खड्ड्यांचा प्रत्येक आठवड्याला आढावा

हिंजवडी फेज एक येथे आईने रस्ता ओलांडला आणि कंपनीच्या गेटमधून ओळखपत्र दाखवून आई कंपनीच्या आत गेली. अभयला रस्ता ओलांडण्यासाठी थोडा वेळ लागल्याने तो थोडा उशिरा गेटवर पोहोचला. मात्र सुरक्षा रक्षकांनी अभयला आतमध्ये सोडले नाही. आपल्याला आईकडे जाता येत नसल्याने तो धाय मोकलून कंपनीच्या गेटवर रडत बसला.

त्याच वेळी हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक सकुंडे तिथून गस्त घालत होते. एक लहान मुलगा मोठमोठ्याने रडत असल्याचे सकुंडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रडणाऱ्या मुलाकडे जाऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अभय असे सांगितले. आई, वडिलांबाबत चौकशी केली असता तो ‘आई’ असे म्हणून कंपनीच्या दिशेने बोट दाखवत असे.

सकुंडे यांनी कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली. मात्र कंपनीत दहा ते बारा वेगवेगळे कंत्राटदार असून त्यातील कोणत्या कंत्राटदाराकडे अभयची आई काम करते हे सांगणे सुरक्षा रक्षकांसाठी कठीण होते.

त्यामुळे सकुंडे यांनी अभयकडे त्याच्या पत्त्याबाबत विचारपूस केली. त्यानंतर सहायक फौजदार सकुंडे आणि पाच वर्षांचा अभय यांचा तब्बल तीन तासांचा प्रवास सुरु झाला. या तीन तासात अभयने सकुंडे यांना बऱ्याच ठिकाणी फिरवले. वाटेत त्याला सकुंडे यांनी खेळणी, आईसक्रीम, खाऊ दिला. पण त्याला पत्ता व्यवस्थित सांगता येत नसल्याने ते पुन्हा कंपनीच्या गेटवर आले.

सुरक्षा रक्षकांना अभयच्या आईबाबत काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सकुंडे यांनी अभयला हिंजवडी पोलीस ठाण्यात आणले. सायंकाळी पुन्हा पेट्रोलिंग करताना फेज एक येथे एक महिला वेड्यासारखी कुणाचा तरी शोध घेत होती.

तिच्याकडे चौकशी केली असता तिचे नाव शीतल असून ती आपल्या पाच वर्षीय मुलाचा शोध घेत असल्याचे सांगितले. सकुंडे यांनी शीतल यांना पोलीस ठाण्यात आणले. आईला बघताच चिमुकला अभय आईच्या कुशीत धावत गेला.

हिंजवडी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अभयला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. सहायक फौजदार अशोक सकुंडे यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्तांनी देखील (Hinjawadi) कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.