Hinjawadi News: आयटी पार्कच्या कामाचा करार एकाशी, काम दिले दुस-याला, बिलाचे 7 कोटी थकवून, 45 लाखाचे साहित्यही घेतले ताब्यात 

एमपीसी न्यूज – आयटी पार्कचे बांधकाम करण्यासाठी एकासोबत करार झाला, त्या इसमाने साईटचा ताबा घेऊन साईटवर 10 कोटीचे काम केले. त्याचे करासहित 17 कोटीचे बिल मालकाला दिले. मालकाने त्यापैकी 10 कोटी देऊन 7 कोटी रूपये थकवले आणि उर्वरित बांधकाम दुस-याकडे सोपविले. दुस-या इसमाने साईटवरील साहित्याची तोडफोड करून 45 लाखाचे साहित्यही घेतले ताब्यात घेत इसमाला संपवून टाकण्याची धमकी दिली.

भुमकर चौक येथील स.नं. 265/2/1ए/1ए या जागेवर 14 मार्च 2018 ते 1 एप्रिल 2022 या कालावधीत ही घटना घडली.

मिलींद सुधाकर रोडे (वय 55, रा. द ग्रेट इस्टर्न रिट्रीट, लकाकी रोड, मॉडेल कॉलनी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रमेश भगवानदास छाब्रिया (रा. औंध), नरेंद्र पाटील (रा. पाषाण) आणि इतर जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश छाब्रीया यांना अपुस रियालिटीज या कंपनीच्या नावाने भुमकर चौक स.नं. 265 / 2 / 1ए / 1ए या जागेवर आयटी पार्क उभारायचा आहे. त्याच्या बांधकामासाठी त्यांनी मिलींद रोडे यांच्याशी करार करून साईटचा ताबा त्यांना दिला.

ताबा मिळाल्यानंतर रोडे यांनी बांधकामासाठी आवश्यक साईट ऑफिस, गोडाऊन, रॉ मटेरियल, उपकरणे, पम्प, पाईप आणि इतर साधन साहित्य साईटवरती आणले. करारानुसार बांधकामाला सुरूवात होऊन साधारण 10 कोटी तीन लाख रूपयांचे काम पूर्ण झाले.

 

उर्वरित सुरू असताना झालेल्या कामाचे बिल मिळण्यासाठी फिर्यादी यांनी खर्च आणि कर याचे 17 कोटी 11 लाख रूपयांचे बिल छाब्रीया यांना दिले. त्यांनी बिलाचे फक्त 10 कोटी रूपये दिले. उर्वरित 7.11 कोटी व डेबिट नोट मिळून 7.96 कोटी रूपये देण्यास टाळाटाळ केली.छाब्रीयाने उर्वरीत काम आरोपी नरेंद्र पाटील याला दिले, आरोपी पाटील साईटमध्ये घुसून फिर्यादी यांचे 45 लाख 72 हजार 880 रूपयांचे साहित्य स्वत:च्या ताब्यात घेऊन गेला. तसेच, साईटवरील ऑफिस व इतर साहित्याचे नुकसान केले.

 

कामगारांना साहित्य न घेऊन जाण्याची विनंती केली असता, आरोपीने फिर्यादी यांना अडवून शिवीगाळ केली तसेच जागेचा ताबा लगेच दिला नाही तर जागेवरच संपवून टाकू अशी धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.