Hinjawadi : फसवणुकीचे बिंग फुटल्याने महिलेला फोनवर शिवीगाळ; विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून ओटीपी मागणाऱ्या महिलेने फोनवरील ठगाची उलट तपासणी केली. आपले फसवणुकीचे बिंग फुटल्याचे लक्षात येताच त्याने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केला. याबाबत बुधवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9570587343 या मोबईल क्रमांकावरून बोलणारा इसम राकेश शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी महिलेच्या मोबाईल फोनवर आरोपीने फोन केला. ‘मी बजाज फायनान्स कंपनीकडून बोलत आहे. तुम्ही घेतलेल्या वस्तूवर चार हजार रुपयांचा रिफंड मिळणार आहे,’ असे आरोपीने सांगितले आणि फिर्यादी यांच्या फोनवर एक मेसेज पाठवला. ‘तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला आहे. तो मला सांगा’ असे आरोपी म्हणाला.

त्यामुळे फिर्यादी यांना त्याचा संशय आला. फिर्यादी यांनी समोरील व्यक्तीचे नाव, एम्प्लॉय आयडी विचारला. आपले फसवणुकीचे बिंग फुटल्याचे लक्षात आल्याने आरोपीने फिर्यादी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.