Mrinal Kulkarni On Fatteshikast: ‘फत्तेशिकस्तच्या माध्यमातून इतिहास जगण्याची संधी मिळाली’

History Gets Opportunity To Live Through Fatteshikast says mrinal kulkarni किल्ले राजगडावर आम्ही शूटिंग केलं. ती घटना आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय होती. हा माझा सर्वात आवडता किल्ला आहे.

एमपीसी न्यूज – मराठी मालिका आणि चित्रपटात अनेकवेळा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊसाहेबांची भूमिका यशस्वीपणे केली आहे. राजा शिवछत्रपती या मालिकेत तर त्या जिजाऊंची भूमिका अक्षरश जगल्या. कारण त्यात त्यांना तरुणपणापासून ते वृद्धत्वापर्यंत ही भूमिका साकारता आली. त्यानंतर मृणाल यांनी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात समर्थपणे जिजाऊंची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘फत्तेशिकस्त’ या लोकप्रिय चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 16 ऑगस्ट रोजी झी टॉकीजवर होणार आहे. चित्रपटगृहात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या घरी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा अविस्मरणीय किस्सा मृणाल यांनी सांगितला. ‘किल्ले राजगडावर आम्ही शूटिंग केलं. ती घटना आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय होती. हा माझा सर्वात आवडता किल्ला आहे.

मी आजोबांसोबत आणि त्यानंतरसुद्धा अनेकदा या किल्ल्याची सफर केलेली आहे. सुमारे 25 वर्षे हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. या किल्यावर शूटिंग करण्याची संधी मिळाली हा खरोखर अंगावर काटा आणणारा क्षण होता’.

‘तिथे जाऊन तोच काळ जागं करणं हा खरंच खूप सुंदर अनुभव होता. आयुष्यभर सर्वांच्या आठवणीमध्ये हा प्रसंग राहिल. महाराजांनी हा किल्ला कसा बांधला असेल? महाराज इथून राज्यकारभार कसा सांभाळत असतील? असे अनेक प्रश्न ज्यांनी हा किल्ला पहिल्यांदा चढला त्यांना पडत होते.

सर्व कलाकारांनी आपल्या पाठीवर शूटिंगचं सर्व सामान घेऊन किल्ला चढला. महाराजांचा इतिहास समोर येण्यासाठी आपलाही छोटा हातभार आहे हा विचार खूप आनंद देऊन जात होता’, असं त्यांनी सांगितलं.

चित्रपटातील जिजाऊंच्या भूमिकेबद्दल त्या पुढे म्हणाल्या, ‘आधी ही भूमिका साकारली असल्यामुळे भरपूर वाचन झालेलं होतं. पण प्रत्येक वेळेला नवीन पैलू दाखवण्याची संधी आपल्याला मिळते याचा जास्त आनंद होतो.

जिजाऊ आऊसाहेब फक्त कारभार सांभाळत नसत तर त्या प्रसंगी तलवारसुद्धा हातात घेत असत. मावळ्यांना वेळेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या संघटना तयार करत असत. या सगळ्या गोष्टी या सिनेमातून दाखवण्याची संधी मला मिळाली याचा मला जास्त आनंद होतो.

त्यामुळे या वेळेला वेगळाच उत्साह होता. जिजाऊ आऊसाहेबांचं युद्ध नैपुण्य आणि राजकारणातलं कौशल्य दाखवण्याची संधी मला फत्तेशिकस्तच्या माध्यमातून मिळाली’.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सादर केलेल्या फत्तेशिकस्तमध्ये मराठ्यांच्या शौर्याची यशोगाथा मांडण्यात आली आहे. यात चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच हरीश दुधाडे, मृण्मयी देशपांडे, अजय पूरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी यांच्यादेखील भूमिका आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.