Vadgaon Maval : दुर्गप्रेमींनीं हाती घेतले तिकोना गडाच्या पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम

लोकसहभागातून चार लाख रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज- नुसत्या शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्यापेक्षा छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यांची निगा राखणे हा खऱ्या अर्थाने महाराजांना मनाचा मुजरा ठरेल. हेच गरज लक्षात घेऊन श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे, श्री शिवशंभू प्रतिष्ठान मावळ व गडभटकंती ग्रुप वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तिकोना गडाच्या पायऱ्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ शिवजयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आला. या प्रकल्पासाठी लोकवर्गणीतून सुमारे चार लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला वास्तुविशारद, अभियंते, रचनाकार तसेच अनेक शिवभक्त हजार होते. सुरुवातीला प्रथम गडावरील सर्व देवीदेवता यांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर गडावरील वितंडेश्वर मंदिरामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी व पोलीस हवालदार विनोद भोकरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

त्यानंतर गणेश प्रतिमेचे पूजन करून विनायक रेणके यांच्या हस्ते कुडाळ मारून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी दिलेल्या जय भवानी जय शिवराय घोषणेनी सारा आसमंत दुमदुमून गेला. यावेळी गडावर बेल, पिंपळ, व वडाची झाडे लावण्यात आली. या कामासाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यानी श्रीनिवास कुलकर्णी 9822788859 आणि अक्षय औताडे 9604091187 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.