IND vs SA : दक्षिण आफ्रिका संघाने रोखला भारतीय संघाचा विजयरथ

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) आधी मजबूत पाकिस्तान संघाला रोमहर्षक सामन्यात नमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही सफाईदार विजय मिळवून अंकतालिकेत प्रथम क्रमांकावर विराजमान असलेल्या भारतीय संघाला आज मात्र दक्षिण आफ्रिका संघाने (IND vs SA) पाच गडी आणि दोन चेंडू राखत पराभूत केले आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांकही हिसकावून घेत उपांत्य फेरीतल्या आपल्या प्रवेशाच्या आशा आणखीनच मजबूत केल्या आहेत. बलाढ्य भारतीय संघातल्या नामांकित फलंदाजांना नामशेष करणाऱ्या लुंगी इंगीडीला त्याच्या जोरदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

टी-20 विश्वकप स्पर्धेतल्या आपल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाची लढत आज पर्थच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झाली,ज्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली खरी,पण त्याच्यासहित प्रथित फलंदाजांनी केलेली हाराकीरी यामुळे भारतीय संघ आपल्या निर्धारित 20 षटकात केवळ 133 धावाच करु शकला अपवाद फक्त सुर्यकुमार यादवच्या जबरदस्त खेळीचा.सुर्यकुमार यादवने केलेल्या आणखी एका अर्धंशतकी खेळीमुळे भारतीय संघाला धावफलकावर या धावा लावता तरी आल्या.

Morbi Cable Bridge Collapses : गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळला,अनेकजण पाण्यात पडल्याची भीती

रोहीत आणि के एल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली खरी,पण आजही ही जोडी चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरली नाहीच.आज राहुल ऐवजी पहिला गडी बाद झाला तो कर्णधार रोहीत शर्मा. त्याने फक्त 15 धावा केल्या.तो बाद होताच के एल राहुल सुद्धा आपल्या कर्णधाराच्या पावलावर पाऊल टाकत तंबूत परतला.त्याने 9 धावा काढल्या. सलामीची जोडी तंबूत परत पाठवून लुंगी इंगीडीने (IND vs SA) दक्षिण आफ्रिका संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या धक्क्यातून सावरण्याआधीच भरवशाचा विराट कोहली सुद्धा आज स्वस्तात बाद झाला आणि भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला.सुर्यकुमार यादवने नेहमीप्रमाणे आपल्या चिरपरिचित शैलीत खेळायला सुरुवात केली पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ द्यायला एकही महारथी तयार नव्हता.

 

दीपक हुडा (0),पंड्या (2)कार्तिक (6)आणि अश्विन (7)धावा करुन झटपट बाद झाले आणि भारतीय संघ पुरता अडचणीत आला.पण सुर्यकुमार यादवने हिंमत न हारता जबरदस्त आक्रमण करत भारतीय संघाला आकार देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, (IND vs SA) पण त्याला दुसऱ्या बाजूने योग्य ती साथ न मिळाल्याने भारताचा डाव 133 धावातच गारद झाला.सुर्यकुमार यादवने आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करताना केवळ 40 चेंडूत 68 धावा करताना चार चौकार आणि 3 षटकार मारले.सुर्यकुमार नंतर रोहीत आणि कोहली हे दोघेच दुहेरी आकडा गाठू शकले. दक्षिण आफ्रिका संघाकडुन लुंगी इंगीडीने 4 तर पार्नेलने 3 गडी बाद करताना भारताच्या डावाला स्थैर्य लाभू दिलेच नाही.

120 चेंडूत 134 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिका संघासाठी फार मोठे आव्हान वाटत नव्हतेच.मात्र अर्शदीप सिंगने डिकॉक आणि रिले रोसोला बाद करुन तर मोहम्मद शमीने कर्णधार बावुमाला बाद करुन सनसनाटी सुरुवात करुन दिली.यावेळी दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था 3 बाद 24 अशी झाली होती.(IND vs SA) यावेळी सामना रंगतदार होईल असे वाटत होते. मात्र त्यानंतर मार्करम आणि डेविड मिलर यांनी जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजयाच्या समीप आणले.ही जोडीच सहज विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच मार्करमला हार्दिक पंड्याने बाद केले तर रवी अश्विनने स्टब्सला बाद करुन सामन्यात काही प्रमाणात रंगत निर्माण केली खरी,पण गोलंदाजाच्या प्रयत्नाना क्षेत्ररक्षकांची योग्य ती साथ न मिळाल्याने दक्षिण आफ्रिका संघाने भारताला 5 गडी राखून पराभूत करत अंकतालिकेत प्रथम क्रमांकही गाठला आणि उपांत्य फेरीतल्या आपल्या प्रवेशालाही मजबूत करण्यात यश मिळवले आहे.

 

याचवेळी भारतीय संघासाठी या पराभवाने फार काही नुकसान केले आहे असे आता तरी म्हणता येणार नाही.भारतीय संघाची पुढील लढत बांगलादेश विरुद्ध येत्या 2 तारखेला तर त्यानंतर झिम्बाब्वे संघाविरुद्ध 6 नोव्हेंबरला होणार आहे,त्यात विजय मिळाले तर भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा बळकट होतील.

 

संक्षिप्त धावफलक

भारत 9 बाद 133

सुर्यकुमार यादव 64,रोहीत 15,विराट 12

इंगीडी 29/4,पार्नेल 15/3

पराभूत विरुद्ध

दक्षिण आफ्रिका

19.4 षटकात 5 बाद 137

मिलर नाबाद 59,मार्करम 52

अर्शदीप 25/2,शमी 13/1

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.