Ind vs Srilanka Test Match  : पहिल्याच दिवशी झाले तब्बल 16 फलंदाज गारद

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : बंगलोरच्या चीन्नास्वामी मैदानावर फलंदाजांची उडाली दैना,पहिल्याच दिवशी बाद झाले तब्बल 16 फलंदाज.एकटा श्रेयस अय्यर लढला, खेळला एक अविस्मरणीय खेळी. दिवसरात्र कसोटीत आजचा पहिला दिवस गोलंदाजांच्या आणि श्रेयस अय्यरच्या नावावर झाला आहे,भारतीय संघाला 252 धावात सर्वबाद केल्यानंतर श्रीलंका संघांची अवस्था आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा श्रीलंका संघाने 6 बाद 86 धावा केल्या असून भारतीय संघाकडे अजूनही तब्बल 166 धावांची मोठी आघाडी आहे.

भारत आणि श्रीलंका संघामधील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या आणि अंतीम सामन्यातल्या आजच्या दिवसरात्र कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी,पण चीन्नास्वामी मैदानावरील या खेळपट्टीने पहिल्याच दिवशी गोलंदाजांना साथ देताना सामन्याचे भविष्य काय असेल हेही स्पष्ट केले.आज भारताने जयंत यादवच्या जागी अक्षर पटेलने संधी दिली तर पाहुण्या संघाने पथूम निसंका आणि लाहीरू कुमाराच्या जागी कुशल मेंडीस आणि जयविक्रमाला संधी दिली.

रोहित शर्माने आज आणखी एका नव्या विक्रमाला आपल्या नावावर केले.तीनही फॉरमॅट मध्ये मिळून चारशेवा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा तो भारताचा 8 वा खेळाडू ठरला.या यादीत सर्वोच्च स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर( 664 सामने )आहे.मात्र या सामन्यात त्याला जराही खास कामगिरी करता आली नाही.मयंक आगरवालने भारतीय डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर आकर्षक कव्हर ड्राईव्ह मारत सुंदर सुरुवात केली, पण सामन्याच्या नवव्याच चेंडूवर तो अतिशय दुर्दैवरित्या धावबाद झाला, गंमत म्हणजे हा चेंडू नोबॉल पण होता, ज्यावर पायचीतचे मोठे अपील झाले, डिआरएसही मागीतले गेले, पण या गोंधळात हकनाक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला.त्यानंतर हनुमा विहारी आणि रोहीतने पुढे खेळत केवळ 19 धावा जोडल्या,रोहीतने एक चौकार आणि एक षटकार मारत 15धांवा केल्या आणि तो एमब्लुडेंनीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्यानंतर आला तो खराब फॉर्म मधून जाणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहली.त्याने हनुमा विहारी सोबत निग्रहाने खेळत 47 धावांची बहुमूल्य भागीदारी केली,81 चेंडु खेळत 31 धावा काढून हनुमा विहारी जयविक्रमाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.यावेळी भारतीय संघाची अवस्था होती तीन बाद 76.यात केवळ दहा धावांची भर पडलेली असताना कोहली धनंजय डिसिल्वाच्या गोलंदाजीवर 23 धावा काढून पायचीत झाला.कोहलीचे अपयश काही केल्या संपत नाही. साधारण तीन वर्षांपूर्वीपर्यंत अक्षरशः जगभर खेळताना खोऱ्याने धावा काढणाऱ्या या महान खेळाडूला मागील 27 महिन्यापासून एकही शतक कुठल्याही फॉरमॅट मध्ये काढता आलेले नाही, प्रत्येक नव्या सामन्यात त्याचे चाहते नवी उमेद ठेवतात,आणि त्यांच्या वाट्याला येते ती फक्त आणि फक्त निराशाच.कोहली बाद झाल्यानंतर आला तो पंत,त्याने श्रेयस अय्यरला साथ देताना आपल्या नेहमीच्याच अंदाजात आजही आक्रमक फलंदाजी केली.

त्याने केवळ 26 चेंडूत  तुफानी 39 धावा काढल्या ज्यामधे 7 चौकारांचा समावेश होता. मात्र एमब्लुडेंनीचा एक इनस्विंग त्याच्या बॅटचा बचाव भेदून स्टंपवर आदळला आणि त्याच्या छोट्या पण विस्फोटक खेळीचा अंत 39 धावावरच झाला.यानंतर काहीच वेळात पहिल्या कसोटीचा मानकरी जडेजा,अश्विन आणि अक्षरही ठराविक अंतराने बाद झाले आणि भारतीय संघाची अवस्था 8 बाद 215 अशी झाली. यानंतर श्रेयसने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली आणि सर्वच श्रीलंकन गोलंदाजांवर तुफानी हल्ला करायला सुरुवात केली.भल्याभल्यासाठी खतरनाक ठरलेली ही खेळपट्टी त्याने जणू स्वतःसाठी वश करून घेतली होती.

आपल्या दुसऱ्या अर्धशतकाला पूर्ण केल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूने साथ द्यायला भरवशाचे कोणी उरलेले नाही हे सत्य जाणल्यानंतर त्याने केवळ चौकार आणि षटकारांच्याच भाषेत बरसायला सुरुवात केली होती. तो आपले दुसरे कसोटी शतक असेच आक्रमक अंदाजात पूर्ण करेल असे वाटत असताना 92 धावा असताना तो जयविक्रमाला षटकार मारण्याच्या नादात यष्टीचित झाला आणि मागील कित्येक सामन्यानंतर आज प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित असलेल्या दर्दी क्रिकेट रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा गडगडाट करत त्याच्या या अविस्मरणीय खेळीला मानवंदना दिली.या खेळपट्टीवर चेंडू अक्षरशः फलंदाजांचे  वस्त्रहरण करतोय असे म्हणाले.तर त्यात काहीही गैर ठरणार नाही.

अशा कठीण पीचवर श्रेयस अय्यरने 98 चेंडूत10 चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारत92 धावा केल्या, पण तरीही त्याने थोडा संयम बाळगत शतक पूर्ण करायला हवे होते ही सल वारंवार मनाला लागून राहील. त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत, हे लक्षात घेता एखादा चेंडू संयमाने तटवून खराब चेंडचा समाचार घेता आलाही असता, पण क्रिकेट मध्ये अशा जरतरच्या तर्काला काहीही अर्थ नसतो हेच पुन्हा एकवार सिध्द झाले. पण श्रेयसच्या या झुंजार खेळीने भारतीय संघाने या भिंगरी खेळपट्टीवर 250 धावांचा टप्पा पार केला जो खूप आहे.

पाहुण्या संघाकडून  जयविक्रमाने 81 धावात तीन गडी बाद केले,तर एमब्लुडेंनीने इतकेच बळी घेताना 94 धावा मोजल्या,तर धनंजय डिसिल्वाने 32 धावा देत दोन गडी बाद केले.

ज्या खेळपट्टीवर बलाढ्य भारतीय फलंदाज ताताथैय्या करत होते त्या खेळपट्टीवर श्रीलंकन फलंदाज वेगळे काय करणार याचा अंदाज होताच. भारतीय गोलंदाजांनी अपेक्षित सुरुवात करून देताना श्रीलंका संघाला 15 धावांच्या आतच तीन मोठे धक्के दिले.बुमराहने  कुशल मेंडीसला दोन तर थिरमनेला 8 धावावर श्रेयस अय्यरच्या हातून झेलबाद केले तर मोहम्मद शमीने लंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेला चार धावावर त्रिफळाबाद करून पाहुण्या संघाची अवस्था तीन बाद चौदा अशी बिकट करून टाकली.

यानंतर मॅथ्यूज आणि धनंजय डिसिल्वाने आणखी 14 च धावा जोडलेल्या असताना शमीने एका अप्रतिम चेंडूवर धनंजयाला पायचीत करून आणखी एक  हादरा देत पाहुण्या संघाची अवस्था चार बाद 28 अशी केली. यानंतर या अडचणीत भर पाडली ती अक्षर पटेलने,दुखापतीनंतर संघात पुनरागमन करताना त्याने आज आपल्या दुसऱ्याच षटकात चरित असलंकाला आश्विनच्या हातून झेलबाद करून लंकेची अवस्था पाच बाद  पन्नास अशी केली.

यावेळी यजमान संघाकडे तब्बल 202 धावांची आघाडी होती,आणि भारतीय गोलंदाज या दडपणाचा नक्कीच फायदा उठवतील असे वाटायला लागले होते, कारण मॅथ्यूज सोडला तर उर्वरित लंकन फलंदाज या खेळपट्टीवर तग धरून उभे राहतील असे मुळीच वाटत नव्हते पण अनुभवी मॅथ्यूजने खेळपट्टीवर पाय रोवत संघाला सावरण्यासाठी एकहाती लढत द्यायला सुरुवात केली.त्याने 84 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकार मारत 43 धावा करत डिकवेलाच्या साथीने सहाव्या गड्यासाठी 35 धावा जोडून संघाला बऱ्यापैकी सावरले असे वाटत असतानाच जसप्रीत बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर त्याला रोहीतच्या हातून स्लिपमध्ये बाद करून त्याची झुंजार खेळी समाप्त केली.

अर्थात या विकेटमध्ये रोहितच्या चपळ झेलाचा पण मोठा वाटा होता.त्यानंतर मात्र डिकवेला आणि एमब्लुडेंनीने आजच्या दिवसाचा खेळ समाप्त होवूस्तोवर आणखी काहीही नुकसान होवू दिले नाही आणि पाहुण्या संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा 6 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या.भारताकडून बुमराहने फक्त 15 धावा देत तीन गडी बाद केले, तर शमीने त्याला त्याच तोलामोलाची साथ देत 18 धावात दोन गडी बाद केले आहेत.

उद्या सामन्याचा दुसरा दिवस असेल, उद्या सकाळी लवकरच पाहुण्या संघाचा डाव शक्य तितक्या लवकर गुंडाळून दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करून पाहुण्या संघाला तिसऱ्याच दिवशी चिरडून मालिका जिंकण्याचा मानस असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.