World Cup 2023 : विराटचे शतक थोडक्यात हुकले, मात्र भारताचा न्यूझीलंडवर शानदार ऐतिहासिक विजय

एमपीसीन्यूज:(विवेक दि. कुलकर्णी),चेस मास्टर विराट कोहलीच्या आणखी (World Cup 2023)एका शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बलाढ्य न्यूझीलंड संघावर दोन षटके आणि 4 गडी राखून पराभूत करत सलग पाचवा विजय मिळवलाच पण त्याचसोबत संघाला अंकतालिकेतही प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे.याचबरोबर 2019 सालच्या विश्वकप स्पर्धेतल्या उपांत्यफेरीतल्या पराभवाचीही भारतीय संघाने परतफेड केली आहे.

त्याआधी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने (World Cup 2023) या विश्वकप स्पर्धेत संघात पुनरागमन करणाऱ्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या शानदार व भेदक गोलंदाजीच्या जोरावर किवी संघाला केवळ 272 धावांवर रोखले. शमीने आज जबरदस्त गोलंदाजी करत वर्ल्डकप मधली सर्वोत्तम कामगिरी करताना 54 धावात 5 गडी बाद केले,ज्यामुळे भारतीय संघाने मोठ्या धावसंख्येकडे कूच करत असलेल्या न्यूझीलंड संघाला केवळ 273 धावांवर रोखून मोठे यश मिळवले होते.

Talegaon Dabhade : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा
जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचे ज्या सामन्याकडे लक्ष लागून राहिले होते, त्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातल्या सामन्यात एक वेळ न्यूझीलंड संघ मोठ्या धावसंख्येकडे कूच करत होता, पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाची मजल 273 धावांपर्यन्तच पोहचली.त्यामुळेच भारतीय संघाने अर्धी बाजी जिंकण्यात यश मिळवले होती त्यानंतरची उरलेली अर्धी बाजी जिंकण्याची जबाबदारी फलंदाजांवर होती ती कोहली आणि कंपनीने सार्थ पार पाडत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

आज रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शार्दुल ठाकूर आणि जायबंदी पंड्या ऐवजी मोहम्मद शमी आणि सुर्यकुमारला संघात स्थान मिळाले.

न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली होती,मोहम्मद सिराजने,कॉंवेला शून्यावर बाद केले तर,शमीने यंग 17 धावावंर बाद करुन न्यूझीलंड संघाची अवस्था दोन बाद 19 अशी केली, पण यानंतर रचीन रवींद्रन आणि मिशेल जोडीने जबरदस्त खेळी करत केलेल्या शानदार भागीदारीमुळे न्यूझीलंड संघाने सामन्यात पुनरागमन केले,यावेळी त्यांना नशिबानेही साथ दिली,जडेजा सारख्या निष्णात क्षेत्ररक्षकाकडुन जीवदान मिळाल्यानंतर या जोडीने त्याचा पुरेपूर फायदा उठवला.दोघेही शतकाकडे वाटचाल करत आहेत असे वाटत असतानाच शमीने रवींद्रनला बाद करुन जोडी फोडली, पण मिशेलने मात्र सुंदर फलंदाजी करत आपले विश्वकप स्पर्धेतले पहिले शतक पुर्ण केले,तो संघाला 300च्या पुढे घेवून जाईल असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला 273 धावांवरच रोखून ठेवले.

न्यूझीलंड संघाकडून मिषेलने सर्वाधिक 130 तर रवींद्रनने75 धावा केल्या तर भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने 5 तर,कुलदीप यादव आणि सिराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

एकूणच न्यूझीलंड संघाची गोलंदाजी आणि भारतीय संघाची भरात असलेली फलंदाजी बघता हे आव्हान आणि हा सामना नक्कीच रंगतदार ठरेल असे सर्वांनाच वाटत होते,मात्र उत्तरादाखल खेळताना कर्णधार रोहित आणि शुभमन गील या जोडीने शानदार सुरुवात करुन देताना ,खास करुन रोहीतच्या छोट्या पण स्फोटक खेळीच्या जोरावर विजयाचा पाया रोवला.रोहितचा खतरनाक फॉर्म आजही तसाच होता,पहिल्याच षटकात त्याने बोल्टला 10 धावा चोपल्या आणि हे आव्हान आमच्यासाठी अजिबात कठीण नाही असेच जणू जाहीर करत विजयाचा शंखनाद केला.

दुसऱ्या बाजूने शुभमन गीलही उत्तम खेळत होता. आज त्याने आपल्या वैयक्तिक 20 वी धाव काढताना एकदिवसीय क्रिकेट सामन्यात केवळ 38 सामन्यात 2000 धावा करुन हाशीम अमलाच्या नावावर असलेल्या विक्रमाला नेस्तनाबूत केले.अमलाने 40 डावात इतक्याच धावा केल्या होत्या ,तर गीलने फक्त 38 सामन्यातच या धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला असलेल्या रोहितच्या बॅटमधून धावां एक्सप्रेसवे वरच्या स्पीडने निघत होत्या ,यामुळेच भारतीय संघाने पहिल्या पॉवरप्ले अखेर 10षटकात बिनबाद 63 धावा करून विजयाचा पाया रोवला होता. ही जोडी आणखी एक शतकी भागीदारी करणार असे वाटत असतानाचा आणि अर्धशतकाच्या जवळ असताना लोकी फर्ग्युसनच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला जोरदार फटका मारण्याच्या नादात तरोहित 46 धावांवर त्रिफळाबाद झाला,त्याचे सहजसाध्य होणारे अर्धशतक हुकले असले तरी त्याने भारतीय संघाच्या विजयासाठी आवश्यक असलेली सुरुवात करून दिलीच होती,संघाच्या विजयापुढे वैयक्तिक कामगिरी तितकी महत्वपूर्ण नसली तरीही रोहीतने जम बसल्यानंतर मोठी खेळी करणाऱ्या विराटचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायलाच हवा.त्यानंतर थोड्याच वेळात गील सुद्धा फर्ग्युसनच्याच गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात 26 धावांवर बाद झाला.

यानंतर मात्र कोहली ,अय्यर जोडीने सामंजस्य दाखवत शानदार फलंदाजी करत डाव सावरला.बघताबघता या जोडीने अर्धशतकी भागीदारी जोडली,दोघेही जमले आणि स्थिरावलेत असे वाटत असतानाच श्रेयस 33 धावांवर असताना आपली एकाग्रता हरवून बसला आणि बोल्टची शिकार ठरला. यानंतर खेळायला आला तो के एल राहूल.

त्यानेही आपली जबाबदारी ओळखून कोहलीला योग्य ती साथ देत भारतीय संघाच्या विजयाच्या आशेला कायम ठेवले,राहुलनेही कोहलीसोबत अर्धशतकी भागीदारी केली, पण तोही 27 धावांवर असताना सॅनटनरच्या गोलंदाजीवर पायचित झाला,अन पाठोपाठ सुर्यकुमार यादवही एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला अन भारतीय प्रेक्षकांच्या मनात पाल चुकचुकली, पण तरीही काळजीचे कारण नव्हते ,कारण दुसऱ्या बाजूला आपल्या अर्धशतकानंतर 49 व्या विक्रमी शतकाकडे कूच करत असलेल्या कोहलीला साथ द्यायला जडेजा होताच,या दोघांनी कसलीही घाई ,आततायीपणा न करता संघाला विजयपथावर आणून ठेवले,या सामन्यातही बांगलादेश सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती.

संघाच्या विजयाला जितक्या धावा हव्या होत्या तितक्याच धावा विराटच्या शतकासाठीही हव्या होत्या,विराटचे शतक व्हावे म्हणून सर्वच उत्सुकतेने सामना बघत होते, विराट 95 वर असताना हेन्रीच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला आणि अख्खे मैदान सुन्न झाले, पण विराटने शतकापेक्षाही महत्वपूर्ण खेळी करुन संघाला विजयी करुन देण्यात मोठा वाटा उचलला होता,विजयाची औपचारिकताच बाकी होती ती जडेजाने सणसणीत चौकार मारत पूर्ण केली आणि भारतीय संघाला 4 गडी आणि 2 षटके राखून विजय मिळवून दिला आणि भारतीय संघाला सलग 5 वा विजयही मिळवून देत न्यूझीलंड संघाला वर्ल्डकप मध्ये पराभूत करून त्यांच्याविरुद्धची या स्पर्धेतली पराभवाची शृंखलाही खंडीत केली.

भारतीय संघाच्या चेस करतानाच्या 33 सामन्यात विराट कोहलीने 32 वेळा नाबाद राहून विजय मिळवून दिला आहे ,म्हणूनच त्याला चेस मास्टर म्हणतात. सलग दुसऱ्या सामन्यात शानदार खेळी करणाऱ्या आणि या विश्वकप स्पर्धेत सर्वांधिक धावा रचणाऱ्या कोहलीलाच सामनावीर म्हणून निवडले जाईल असे सर्वाना वाटत होते पण त्याच्या इतकीच महत्वपूर्ण कामगिरी गोलंदाजीत करून 5 गडी बाद करणाऱ्या मोहम्मद शमीला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.