India Vs West Indies 2nd ODI : दुसऱ्या सामन्यातल्या दणदणीत विजयासह भारतीय संघाने विंडीज संघावर मिळवला मालिका विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि.कुलकर्णी) : नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मानहानीकारक कटू स्वप्नासम पराभावाने नाराज झालेल्या भारतीय क्रिकेट रसिकांच्या नाराजीला कमी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाने नक्कीच केला असे म्हणण्यासारखी परिस्थिती आज अनुभवता आली आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला आजच्या दुसऱ्या सामन्यातच भारतीय संघाने जिंकताना विंडीज संघाचा 45 मोठ्या धावांच्या फरकाने पराभव केला.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाला सामना सुरू होण्याआधीच एक मोठा धक्का बसला. नियमित कर्णधार कायरन पोलार्ड दुखापत झाल्यामुळे खेळू शकणार नाही हे समजल्यावर युवा प्रतिभावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकोलस पुरनच्या गळ्यात हे कर्णधारपदाचे ओझे पडले. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय डावाची सुरुवात आज अनेक चित्रविचित्र धक्क्यानेच सुरु झाली. ईशान किशन ऐवजी संघात स्थान मिळालेला के एल राहुल सलामीला येईल असे वाटत असतानाच चक्क ऋषभ पंत कर्णधार रोहीतच्या जोडीने सलामीला आला.पहिल्या सामन्यात जोरदार कामगिरी करणारा रोहीत आज अतिशय स्वस्तात बाद झाला. यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याच्या नादात चेंडु त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक होपच्या हातात विसावला.

सामन्याच्या तिसऱ्याच षटकात केमार रोचने त्याचा महत्त्वपूर्ण बळी मिळवून कर्णधार पुरनचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ ठरवला.रोहीतने फक्त पाच धावा केल्या. त्यानंतर अडखळत खेळणाऱ्या आणि पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या पंत कडून खूप अपेक्षा होत्या, मात्र त्याने आजही निराश केले. 34 चेंडूत 18 धावा कुंथुन(अगदी बरोबर वाचले तुम्ही) तो एक अतिशय खराब फटका मारून बाद झाला.

प्रतिभा, आक्रमता या दागिन्यांबरोबर बेजबाबदारपणाही हा त्याचा मोठा दुर्गुण आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. ओडियन स्मिथच्या चेंडूला मैदानाबाहेर फेकण्याची घाई त्याला नडली आणि चेंडू मिडऑन असलेल्या जेसन होल्डरच्या हातात अलगद विसावला. स्मिथने याच षटकात कोहलीला सुद्धा बाद करुन भारतीय गोटात एकच खळबळ उडवून दिली. आधी सावधगिरीने खेळत असलेल्या कोहलीला आज तरी फॉर्म गवसावा असे त्याच्या अनेक चाहत्यांना वाटत असले तरी नियतीच्या मनात मात्र तसे अजिबात नव्हते.

30 चेंडू खेळून 18 या वैयक्तिक धांवावर तो बाद झाला,यावेळी भारतीय संघाची अवस्था 12 व्या षटकाखेर तीन बाद 43 अशी कठीण झाली होती. साधारण तीन वर्षापूर्वीच तो जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज वाटत होता. प्रत्येक सामन्यागणिक एकेक विक्रम पायदळी तुडवले जात होते.

दि ग्रेट सचिनच्या 100 शतकांच्या विक्रमाला तो सहज मागे टाकून क्रिकेटच्या इतिहासातला एक दैदीप्यमान अध्याय होईल असे वाटत असतानाच क्रिकेट नावाच्या नियतीने आपले रंग दाखवले आणि त्याच्या बॅट मधून निघणारा धांवाचा रतीब थांबला आहे,तो ओघ लवकरच चालू व्हावा इतकीच प्रार्थना करणे आपल्या हातात आहे,नाही का?

त्यानंतर मात्र के एल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय डावाला सावरणारी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला योग्य तो सन्मान देत खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेत त्यांची फलंदाजी बहरू लागली. दोघेही भरात आले होते,एक मोठी भागीदारी फुलत असतानाच अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या राहुलला दुसरी धाव काढण्याच्या नादात धावबाद व्हावे लागले आणि 49 धावांवर त्याची उपयुक्त खेळी संपली, पण यात त्याचीच चूक होती, दुसरी धाव घेण्यासाठी त्यानेच सूर्यकुमार यादवला कॉल दिला होता. मात्र तंबूत परतत असताना त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

यानंतर सूर्यकुमार यादवने थोड्याच वेळात आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आणखी चौदा धावा काढून तो बाद झाला, पण सुंदर, हुडा, चहल यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे भारतीय संघाने आपल्या पन्नास षटकात नऊ गडी गमावून 237 धावा केल्या.विंडीजकडून जोसेफ व स्मिथ यांनी दोन दोन तर रोच,ऍलन, होल्डर, अकिल यांनी प्रत्येकी एक एक बळी मिळवला आणि बलाढ्य (मायदेशी तरी, दक्षिण आफ्रिकेत झालेले वस्त्रहरण कोणीही विसरले नसेलच अजुन तरी)/भारतीय संघाला 250 च्या आत रोखून चांगलीच कामगिरी केली असे म्हणावे लागेल.

हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी 238 या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघानी सावध पण चांगली सुरुवात केली. शाई होप आणि ब्रेंडन किंग या सलामीजोडीने सात षटकात 38 धावा जोडून इरादे स्पष्ट केले असे वाटत असताना प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीला आला आणि त्याने चमकदार कामगिरी करत आपल्या पहिल्या तीन षटकात दोन षटके निर्धाव टाकत केवळ 2 धावा देऊन ब्रेंडन किंग आणि ब्राव्होला यष्टीमागे पंतच्या हातात झेल देऊन बाद करवून भारतीय संघाला चांगले यश मिळवून दिले.

त्यानंतर पहिल्या सामन्यातील मानकरी चहलने शाई होपला बाद करून भारतीय संघाला आणखीन एक यश मिळवून दिले.होपने विंडीजला बऱ्यापैकी होप दाखवल्या, पण तो त्या होप्स 27 धावा करूनच संपवून गेला.एकदा विकेट्स पडायला लागल्या की विंडीज संघाचा डाव गडगडतो हे अलीकडच्या काळात दुर्दैवाने खूपदा बघायला मिळाले आहे.

दुर्दैवाने यासाठीच की कुठल्याही देशाचा निस्सीम क्रिकेटरसिक विंडीज खेळाडूंचा फार मोठा चाहता असतो,त्यांच्या बेदरकार खेळाचे अनेक चाहते आहेत, त्यांना आताच्या विंडीज संघाच्या खेळाने मनाला निश्चितच वेदना होतात.पण तरिही कुठेतरी एक जोरदार लढत होईल या अपेक्षेने बघणाऱ्या रसिकांना तसे चित्र काही दिसले नाही, कारण भारतीय गोलंदाज खास करुन कृष्णाचे इरादे आज विंडीज संघाला लवकरात लवकर नेस्तनाबूत करायचेच होते.

त्याने कर्णधार पुरनला वैयक्तिक 13 धावावर बाद करुन आपला तिसरा बळी मिळवला,तर शार्दुल ठाकूरने सुद्धा पहिल्या सामन्यातला अर्धशतकवीर होल्डरचा खेळ केवळ दोन धावांवर खल्लास करून पाहुण्यांची अवस्था पाच बाद 76 अशी केली. यामुळे भारतीय संघ विजयासमीप आला होता, आता फक्त त्याची औपचारिकताच बाकी होती,मात्र शामराह ब्रूक्स(44), अकिल हुसेन( 34,)स्मिथ(24) यांनी दिलेल्या लढतीमुळे भारताला विजय मिळवण्यासाठी बऱ्यापैकी झुंजावे लागले मात्र विजय तो विजय मग भले तो दणदणीत असो वा रोमहर्षक वा निसटता असो, तो विजयच असतो.

अखेरचा फलंदाज केमार रोच याला कृष्णा ने बाद करुन भारतीय संघाने नवीन कर्णधार रोहीत शर्मा याच्या पूर्णवेळ कर्णधारपदातला पहिला मालिका विजय मिळवला. योगायोग म्हणजे भारताचा हा विंडीज विरुद्धचा सलग अकरावा विजय आहे. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णाने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना 12 धावा देत चार गडी बाद केले, तर त्याला शार्दुल ठाकूरने 2 गडी बाद करत चांगली साथ दिली. चहल, हुडा आणि सिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

या सामन्याच्या दरम्यान 19 वर्षाखालील युवकांनी नुकताच वेस्ट इंडीज मध्ये झालेल्या विश्व करंडक स्पर्धेत विक्रमी पाचवे अजिंक्यपद जिंकल्याने त्या संघाचा प्रशिक्षक विविस लक्ष्मण, कानेटकर आणि साईराज बहुतुले यांच्यासह सम्पूर्ण संघाचा गुजरात क्रिकेट असोशीएशनने सत्कार करून गौरवले.

धावफलक –

  • भारत 237/9 –  राहुल 49,सूर्यकुमार 64
  • विंडीज सर्व बाद 193 – कृष्णा 4 विकेट्स

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.