Pimpri News : ‘त्या’ बांधकाम व्यावसायिक, महापालिका अधिका-यांची चौकशी करा; फेडरेशनची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील नियमबाह्य गृहप्रकल्प उभारलेल्या बांधकाम व्यावसायिक आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशननने केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.त्यात फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी म्हटले आहे की, शहरातील बऱ्याच बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम परवान्यामधील अटी व शर्तीचे उलंघन केलेले आहे.पूर्वीच्या मंजूर बांधकाम प्लॅनमध्ये सोसायटी धारकांच्या संमतीशिवाय बदल (प्लॅन रिवाइज) केलेले आहेत. गृहप्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना आपल्या बांधकाम विभागाने बिल्डरने नियमाप्रमाणे बांधकाम केलेले आहे का ? सर्व अटी-शर्ती पाळल्या आहेत का ? याची पहाणी न करता अशा गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. बऱ्याच बांधकाम व्यावसायिकांनी नियमानुसार बांधकाम केलेले नाही. बांधकाम परवान्यामधील अटींचे उल्लंघन केलेले आहे.तसेच ग्राहकांच्या अग्रीमेंटमध्ये लिहून देऊन देखील त्या गोष्टी केलेल्या नाहीत.

भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत बांधकाम व्यावसायिकाने स्वतः स्वखर्चाने पाणी पुरविणे या महापालिकेने लिहून घेलेल्या हमीपत्राप्रमाणे सोसायटीधारकांना पाणी न पुरवून हमी पत्राचे उल्लंघन केलेले आहे.अशा सर्व गोष्टीची आपण पूर्वीचे आयुक्त तसेच बांधकाम परवाना विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच शहर अभियंता यांच्याकडे फेडरेशनने लिखित तक्रारी केलेल्या आहेत.तरी देखील बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घातले जात आहे.फेडरेशनने आजपर्यंत ज्या-ज्या बांधकाम व्यावसायिकांच्या बेकायदेशीर कामाबद्दल बांधकाम व्यावसायिकांच्या विरुद्ध पूर्वीचे आयुक्त, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, शहर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्याची चौकशी होऊन बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालणाऱ्या बांधकाम विभागाचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिक यांच्यावर कारवाई करावी.सोसायटी धारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सांगळे यांनी निवेदनातून केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.