IPL 2020 : राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी, चेन्नईवर 16 धावांनी मात

एमपीसी न्यूज – राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ज संघावर 16 धावांनी मात करत विजयी सलामी दिली आहे. राजस्थानने दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ 20 षटकात 200 धावांत आटोपला. डु-प्लेसिसने केलेल्या 72 धावांची खेळी चेन्नईला विजय मिळवून देऊ शकली नाही.

वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतू वॉटसन माघारी परतल्यानंतर चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. फाफ डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडेच पडले. डु-प्लेसिसने 72 धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने 6, आर्चर-गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

त्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या वादळी खेळीचा चेन्नईला फटका बसला. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि अखेरच्या षटकांत जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे राजस्थानने सामन्यात 216 धावांपर्यंत मजल मारली. सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या. स्मिथनेही 69 धावा करत कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली.

मधल्या फळीत डेव्हिड मिलर, रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, रियान पराग हे फलंदाज झटपट माघारी परतले. अखेरच्या षटकांत स्टिव्ह स्मिथही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. चेन्नईकडून सॅम करनने 3, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.