Kadadhe : निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना भरीव मदत करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – गावाच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुनील शेळके यांनी केले. निवडणूक बिनविरोध करणाऱ्या मावळातील ग्रामपंचायतींना भरीव वैयक्तिक मदत करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.

पवन मावळातील कडधे येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन शेळके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलवून कडधे ग्रामस्थांनी चांगला पायंडा पाडल्याबद्दल शेळके यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती अतिष परदेशी, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, नितीन मराठे, गणेश धानिवले, पंचायत समिती सदस्य दत्ताशेठ शेवाळे, नामदेव पोटफोडे तसेच महादू कालेकर, नामदेव ठुले, बबनराव वर्वे व आजी-माजी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर मान्यवर तसेच कडधे गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी एकत्र आले पाहिजे, हा चांगला आदर्श कडधे गावाने तालुक्यातील सर्व गावांपुढे ठेवला आहे. कडधे गावाने पुढील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन शेळके यांनी केले. मावळ तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे गावांचा अधिक वेगाने व चांगला विकास होईल. त्यासाठी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना भरीव वैयक्तिक मदत केली जाईल, अशी घोषणाही शेळके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.