Talegaon Dabhade : अकार्यक्षम मुख्याधिकारी शहरात आणला; सुनिल शेळके यांचा खासदार बारणे यांच्यावर थेट आरोप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा ( Talegaon Dabhade) बट्ट्याबोळ करुन जनतेला वेठीस धरणारे आज घरात बसलेत. त्यांनी तळेगावच्या जनतेला उत्तर द्यावं. असा टोला आमदार सुनिल शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिला आहे. मागील काही महिन्यांपासून नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मागील सहा महिन्यांपासून शहरातील कचरा, स्वच्छता, पाणी पुरवठ्यावरुन नागरिक त्रस्त झाले आहेत.

सध्याचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांची तीव्र नाराजी असून मुख्याधिकाऱ्यांना मात्र जनतेच्या मुलभुत प्रश्नांविषयी कुठलेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. माजी मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. अजून दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना काहींनी स्वतःसाठी आणलेला अकार्यक्षम मुख्याधिकारी तळेगाव शहरातील कचरा, रस्ता, पाणी असा एकही प्रश्न सोडवू शकला नाही.

त्यांना फक्त टक्केवारीत रस आहे का ? मागील तीन वर्षात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला. निधी उपलब्ध असलेल्या रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक बंद ठेवली आहेत. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे बिल ठेकेदाराला दिले जात नाही. मुख्याधिकाऱ्यांकडून कुठलाही पाठपुरावा केला जात नाही.

Maharashtra : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे प्रकाशन

नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेक मुख्याधिकारी आले. प्रशासक आले. विजय सरनाईक यांच्यासारख्या चांगल्या (Talegaon Dabhade) अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक राजकारण करुन एन.के.पाटील सारख्या भ्रष्ट मुख्याधिकाऱ्याला नगरपरिषदेत कुणी आणले.

ज्यांनी असा अकार्यक्षम मुख्याधिकारी शहरात आणला ते खासदार श्रीरंग बारणे व ज्यांच्या सांगण्यावरून आणला ते स्थानिक नेते तळेगाव शहराच्या सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी न घेता घरात बसलेत. असा आरोप आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.

आमच्या समस्यांकडे आमदारांनी लक्ष द्यावे, अशी सुचना शहरातील नागरिकांनी केली होती. त्यांच्या सुचनेचा आदर करतो. (Talegaon Dabhade) सध्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही. नगरपरिषदेकडे कर भरुन देखील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मी स्वतः मागील दहा महिन्यांपासून नगरपरिषदेत पाऊल ठेवले नाही. शहरातील असे गलिच्छ राजकारण थांबवण्यासाठी जनतेने देखील साथ देणे गरजेचे आहे, असे आमदार सुनिल शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.