BNR-HDR-TOP-Mobile

Kamshet : कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दुचाकीला मागच्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील युवकाला गंभीर दुखापत झाली. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या युवकाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी (दि. 11) कामशेत येथे एरंडे कॉम्प्लेक्स जवळ घडली.

चिखलसे मावळ येथील युवा कार्यकर्ते सुधीर सोनाभाऊ काजळे (वय 35) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. स्नेहल जालिंदर दांगट (रा. उंब्रज, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल कचरू खंडागळे (वय 25, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल सोमवारी रात्री एकच्या सुमारास स्विफ्ट कार (एम एच 14 / जे डी 5086) मधून जात होता. त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून कार बेदरकारपणे चालवली. त्याने नायगाव जवळ शिवराज हॉटेलसमोर मोपेड दुचाकीला (एम एच 14 / एच बी 5195) धडक दिली. त्यानंतर भरधाव वेगात गाडी चालवून त्याने कामशेत येथे एरंडे काॅम्प्लेक्स जवळ सुधीर काजळे यांच्या प्लॅटिना दुचाकीला (एम एच 14 / सी आर 9468) मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात सुधीर यांना गंभीर दुखापत झाली.

त्यांना तात्काळ उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी (दि. 14) सुधीर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीने दोन ठिकाणी अपघात केले असून दोन्ही ठिकाणी तो न थांबता पळून गेला. आरोपी कामशेत येथून कार्ला फाटा येथे गेला असता त्याची कार उलटली. त्यात आरोपी देखील जखमी झाला आहे. याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक झेंडे तपास करीत आहेत.

सुधीर काजळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, बहीण , भाऊ गोरख असा मोठा परिवार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.