Khadki Terminal: खडकी स्टेशन होणार स्वतंत्र टर्मिनल, पुणे रेल्वे स्टेशनचा भार होणार हलका

एमपीसी न्यूज:  पुणे रेल्वे स्टेशन हे सर्वात मोठे स्टेशन आहे. या ठिकाणी सहा फलाट आहेत. मात्र असं असलं तरीही या ठिकाणी अनेकदा जागा कमी पडते. लाखो प्रवासी दररोज या रेल्वे स्टेशन वरून प्रवास करीत असतात. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन वरील भार कमी करण्यासाठी खडकी स्टेशन या ठिकाणी स्वतंत्र टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. (Khadki station) रेल्वे स्टेशन परिसरातील काही जागा संरक्षण विभागाला देण्यात आली होती. ती जागा परत मिळवून त्याठिकाणी स्वतंत्र टर्मिनल सुरू करण्याचा रेल्वे विभागाचा मानस आहे. ही जागा परत मिळवण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

 

संरक्षण विभागाकडून ही जागा मिळाल्यानंतर खडकी रेल्वे स्टेशनचा विकास करून त्या ठिकाणी स्वतंत्र टर्मिनल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा ही तयार आहे. (Khadki Terminal) या टर्मिनल ला मंजुरी मिळाल्यास पुणे स्टेशन प्रमाणेच या ठिकाणाहून गाड्या सोडल्या जातील. खडकी परिसरात स्वतंत्र टर्मिनल झाल्यास त्याचा फायदा पिंपरी चिंचवड परिसरातील प्रवाशांना मिळणार आहे. खडकी सोबतच शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचाही विकास केला जाईल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पुणे रेल्वे स्थानकावरून सध्या दररोज 45 रेल्वे गाड्या सुटतात. तर 80 हून अधिक गाड्या या ये जा करत असतात. भविष्यात पुणे रेल्वे स्थानकावरून आणखी काही गाड्या वाढण्याची शक्यता आहे. आणखी गाड्या वाटल्या तर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात भार येऊ शकतो. खरंतर पुणे रेल्वे स्थानकावरील हा भाग कमी करण्यासाठी हडपसर या ठिकाणी स्वतंत्र टर्मिनल तयार करण्यात आला आहे. परंतु त्या ठिकाणी म्हणाव्या तेवढ्या सुविधा नाहीत. त्या ठिकाणी सुविधा करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळेच खडकी येथे टर्मिनल सुरू करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने विचार करून रेल्वे मंत्रालयाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.