Maharashtra Political Crises: आमदार झाले आता खासदारांची बारी

पश्चिम महाराष्ट्रातील दोन खासदार शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत? 

एमपीसी न्यूज: शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले. राज्यातील बहुतांश शिवसेनेचे आमदार, कार्यकर्ते शाखाप्रमुख जिल्हाप्रमुख असे मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करत असतानाच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. (Maharashtra Political Crises) पश्चिम महाराष्ट्रातील दोन खासदार लवकरच शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही खासदार शिंदे गटात सहभागी होतील असे देखील सांगितले जाते. 

 

खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने हे दोघेही शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सध्या सुरू आहे. संजय मंडलिक यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून विजय मिळवला होता. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेवर सेनेचा झेंडा फडकला होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली आहे. कोल्हापुरातील आमदार हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. (Maharashtra Political Crises) त्यानंतर आता हे दोन्ही खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा देखील चर्चा आहेत. दरम्यान असं असलं तरीही या दोघांनीही आपण अजूनही शिवसेनेतच आहोत अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आणि कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात संजय मंडलिक उपस्थित नव्हते. तर दुसरीकडे धैर्यशील माने मातोश्री वरील बैठकीला तरी गेले होते मात्र कोल्हापूरच्या मेळाव्याकडे फिरकले नव्हते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे हे दोन्हीही खासदार लवकरच शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.