Khelo India Competition : कब्बडीत मुलींचे रूपेरी यश; मुलांच्या संघाला कांस्यपदक

एमपीसी न्यूज – कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रूपेरी यश मिळवले. हरियानासोबत सुवर्णपदकासाठी झालेली लढत त्यांना जिंकता आली नसली तरी दुसरे स्थान पटकावले. हरियानाकडून (४८ – २९) १९ गुणांनी पराभव झाला. मुलांच्या संघाला कांस्य पदक मिळाले.

 

येथील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला कबड्डीत मुलींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हरियानाच्या पूजाच्या चढायांपुढे महाराष्ट्राचा संघ निष्प्रभ ठरला. एक – दोन पकडी वगळता महाराष्ट्र संघाला फार प्रभाव दाखवता आला नाही.

 

सामन्यात पहिल्या चढाईत पहिला बोनस पॉईंट हरियानाने घेतला. महाराष्ट्रानेही पहिल्या चढाईत गुण मिळवला. पुन्हा हरियानाचीही चढाई यशस्वी ठरली. टाईम आउटला स्कोर चारच्या बरोबरीत होता. हरियानाच्या पूजाने चढाईत दोन गुण मिळवले. दुसऱ्या टाईम आऊटला महाराष्ट्र ६ तर हरियाना ७ गुणांवर होता. इथपर्यंत लढाई दोलायमान होती. परंतु पूजाची दुसरी चढाईही महाराष्ट्रावर भारी पडली. त्यात दोन पॉईंट गेले. यशिकाच्या यशस्वी चढाईने स्कोर ९ – ९ झाला.

 

पूजाने पु्न्हा तीन गुण घेतले. पहिल्याच हापमध्ये महाराष्ट्र ऑलआउट झाला. परिणामी हरियानाला (१८ – १२) सहा गुणांची आघाडी मिळाली. पूजाच्या चढाईने पहिल्या हापला हरियाना (२५) महाराष्ट्र (१५) १० गुणांनी पिछाडीवर पडला. महाराष्ट्राची हरजीत व यशिका, मनिषा बोनस गुण घेत राहिले. परंतु महाराष्ट्राला पकडी करता आल्या नाही.
दुसऱ्या हापमध्ये टाईम आऊटला हरियानाने (३३ गुण) आघाडी घेतली. महाराष्ट्राचे १९ गुण होते. सामन्यात सात मिनिटे उरली असताना महाराष्ट्राला पु्न्हा एका ऑल आउटला सामोरे जावे लागले. परिणामी हरियानाला २१ गुणांची भरभक्कम आघाडी मिळाली. त्यांच्या पूजाची एकही चढाई गुणांविना गेली नाही. शेवटी १९ गुणांनी महाराष्ट्राचा पराभव झाला.

 

 

कब्बडीतील विजेते (मुले)

सुवर्ण – हिमाचल प्रदेश
रौप्य – हरियाना
कांस्य – महाराष्ट्र व उत्तर प्रदेश
मुली
सुवर्ण – हरियाना
रौप्य – महाराष्ट्र
कांस्य – आंध्र प्रदेश व तामीळनाडू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.