Rathani News: तापकीरनगर – ज्योतिबानगर प्रभागात अंधाराचे साम्राज्य

एमपीसी न्यूज – नव्याने निर्माण झालेल्या तापकीरनगर – ज्योतिबानगर – रहाटणी प्रभागातील रस्त्यांवरील दिवाबत्ती सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तातडीने सार्वजनिक रस्त्यांवरील दिवाबत्ती सुरु करावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 32 मध्ये तापकीरनगर, ज्योतिबानगर, रहाटणी या भागाचा समावेश होतो. सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या या भागात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. प्रामुख्याने सार्वजनिक रस्त्यांवरील वीजेचे खांब नुसतेच नावाला आहेत. मर्क्युरी दिवे सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.

याबाबत रहिवाशांनी तक्रारी करुनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. केवळ ठेकेदार पोसण्याचे काम अधिकारी वर्ग करत आहे. सार्वजनिक दिवाबत्ती बंद असल्याने किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. अंधाराच्या साम्राज्यामुळे चो-यामा-या वाढल्या आहेत. या घटना पाहता आझाद कॉलनी, अश्विनी कॉलनी, राजवाडेनगर परिसर आणि प्रभाग क्रमांक 32 मधील मर्क्युरी दिवे सुरु करावेत, अशी मागणी  तापकीर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.