Kivale News : किवळे गावातील तरुणांचा ‘जलपर्णीमुक्त पवनामाई’चा संकल्प

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या किवळे येथील पवना नदीतील जलपर्णी काढण्यास नुकताच प्रारंभ झाला. मात्र, हे काम महापालिका किंवा कोणा ठेकेदाराने सुरु केलेले नाही, तर जलपर्णीमुक्त पवनामाईचा संकल्प केलेल्या किवळे गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने केले.

सध्या पवना नदीवर जलपर्णीचे आच्छादन असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नदी पात्रालगत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा धोकाही वाढला आहे. आधीच शहरावर कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. अशा परिस्थितीत पवनेतील वाढती जलपर्णी स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी बनली होती.

या पार्श्वभूमीवर स्थानिक शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुन नदी पात्रातील जलपर्णी काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर प्रशासनाची वाट न पाहता जलपर्णी काढण्याबाबत काही करता येईल का, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या.

या चर्चेत पवनामाई जलपर्णीमुक्त करण्याचा विषय स्थानिक जागरूक युवकांनी मांडला. त्यानुसार पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचा संकल्प करण्यात आला.

अखेर दोन दिवसांपूर्वी रविवारी सकाळी किवळे गावठाण येथील महादेव मंदिराजवळ पवना नदीचे जलपूजन करुन युवकांनी जलपर्णी काढण्यास प्रारंभ केला. याकामी सुमारे दोनशे युवकांनी सहभाग घेतला होता.

शिवगर्जना व श्रमदान करीत युवकांनी जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात केली. दुपारपर्यंत जलपर्णी काढण्याची मोहीम राबविल्यानंतर पुन्हा येत्या रविवारी 28 मार्चला दिवसभर पुन्हा नदीतील उर्वरित जलपर्णी काढण्याचा संकल्प युवकांनी केला.

किवळेतील युवकांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जलपर्णी काढण्याच्या पर्यावरण पूरक उपक्रमास किवळे ग्रामस्थ, निगडी येथील लायन्स क्लब, नाद, सह्याद्री, आयसीसी सायकल ग्रुप तसेच पवना जलशुद्धी ग्रुप यांचेही सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.