Bhosari : दोन एटीएम मशीन फोडून 35 लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन एटीएम मशीन फोडून 35 लाख 26 हजार 100 रुपयांची रोकड अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना धावडेवस्ती भोसरी येथे शनिवारी (दि. 16) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.

सचिन शिवकरण काळगे (वय 21, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक रोडवर धावडेवस्ती येथे सोनाली बिर्याणी हाऊस व बार च्या शेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. त्यामध्ये दोन एटीएम मशीन आहेत. शुक्रवारी (दि. 15) रात्री अकरा ते शनिवारी (दि. 16) सकाळी सव्वाअकरा च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापून एटीएम फोडले. एका मशीन मधून 20 लाख 18 हजार 400 तर दुसऱ्या मशीन मधून 15 लाख 7 हजार 700 असा एकूण 35 लाख 26 हजार 100 रुपयांची रोकड चोरून नेली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.