Lata Didi & Asha Tai: दीदी आणि माझ्यात संगीतविषयक चर्चा खूप कमी होते – आशा भोसले

Lata Didi & Asha Tai: Didi and I had very little discussion about music - Asha Bhosle 'आम्ही एकाच परिवारातील आहोत आणि आमच्या चर्चा या रोजच्या जीवनातील असतात. आमचे जीवन अगदी खाजगी आहे, असं आशा भोसले म्हणाल्या.

एमपीसी न्यूज – सध्या लॉकडाऊनमध्ये सगळे घरीच आहेत. आता अनलॉक झाल्याने थोडेफार व्यवहार सुरु झाले आहेत. पण अजूनही बरेच निर्बंध आहेतच. अशावेळी दिग्गज कलाकार आपला वेळ कसा बरं घालवत असतील असा आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो. त्यावर आशा भोसले यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या सहज स्वभावाला अनुसरुन उत्तर दिले.

आशाताई म्हणाल्या की, ‘माझ्यात आणि दीदीमध्ये संगीतविषयक क्वचितच चर्चा होते. आम्ही एकाच परिवारातील आहोत आणि आमच्या चर्चा या रोजच्या जीवनातील असतात. आमचे जीवन अगदी खाजगी आहे. त्यामुळे आमच्या जीवनावर चित्रपट व्हावा अशी माझी तरी इच्छा नाही’.

एकेकाळी लता आणि आशा या दोघीही पेडररोड येथील प्रभूकुंज या इमारतीत राहात असत. सध्या आशाताई तेथे राहत नाहीत. लतादीदीविषयी बोलताना आशाताई म्हणाल्या ‘दीदी आता 90 वर्षांची आहे आणि ती तिच्या घरी खुशाल आहे. मी सध्या या काळात स्वत:ला व्यस्त ठेवले आहे. माझे एक युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. घरी राहून जमेल तसा व्यायाम करणे, घरातल्यांसाठी नवीन नवीन पदार्थ बनवणे, चित्रपट बघणे हा माझा सध्याचा दिनक्रम आहे’.

‘मी सध्या संगीतरचना देखील करत आहे. परंतु त्यावर अजूनही शब्द मिळाले नाहीत. त्या स्वररचनांवर गीते लिहिण्यासाठी मी कदाचित प्रसून जोशी आणि जावेद अख्तर यांना सांगेन. त्यामुळे त्यांच्या रेकॉर्ड झाल्यावर मी त्या माझ्या युट्यूब चॅनेलवर शेअर करेन. माझ्याकडे दिवंगत संगीतकार आणि माझे पती राहुलदेव बर्मन यांच्या अनेक अप्रकाशित संगीतरचना आहेत’.

‘माझ्या पिढीतील आता कोणीही हयात नाही, जे त्या युगाचे वर्णन करु शकतील. मी माझे पहिले गाणे ब्रिटीश काळातील भारतात म्हणजे 1943 साली पहिल्यांदा रेकॉर्ड केले होते. मी भारताचे विभाजन, स्वातंत्र्य, दुसरे विश्वयुद्ध, अनेक जीवघेण्या साथी आणि संघर्षपूर्ण काळ पाहिला आहे. त्यामुळे माझ्याकडे सांगण्यासारखे बरेच आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.