Pune : महाराष्ट्रातील सत्ते प्रमाणेच देशात पुढील सत्तांतर होणार – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे भाकीत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात राष्ट्रवादी – काँग्रेस – शिवसेना यांचे जसे सरकार स्थापन झाले तसेच देशात पुढे सत्तांतर होणार असल्याचे भाकीत सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमाला आयोजित केली होती. पुणे महापालिकेच्या नथुजी मेंगडे जलतरण तलावासमोर शाहू कॉलनी कर्वेनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्षम नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, ललिता सबनीस यावेळी उपस्थित होते.

नेपाळ काठमांडू येथे झालेल्या 13 व्या दक्षिण आशियाई तायकवानदो स्पर्धेत मारुती भैरवनाथ तायकवानदो अकॅडमीच्या श्री छत्रपती पुरस्कार विजेती (वकील) पूर्वा दत्तात्रय दीक्षित व रुचिका श्रीरंग भावे यांनी भारतासाठी सुवर्ण पदक मिळविले. त्याबद्दल या दोघींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक श्री छत्रपती पुरस्कार विजेते, प्रशिक्षक लाला लक्ष्मण भिलारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तर, नासा संस्थेत निवड झाल्याबद्दल उत्कर्षा गणेश कराळे हिला शुभेच्छा देण्यात आल्या.

श्रीपाल सबनीस म्हणाले, साताऱ्यातील सभेत शरद पवार भिजल्याने मरगळ आलेल्या दोन्ही काँगेसला ऊर्जा मिळाली. आपल्या घरातील व्यक्ती जेव्हा विरोधकांशी हात मिळवणी करतात, ती गोष्ट पवारांप्रमाणेच माझ्याही काळजाला भिडली. मात्र, पवारांनी त्यावर उत्तम असा तोडगा काढला. साहित्यिक आणि साहित्यावर प्रेम करणारे शरद पवार आहेत. काळ्या मातीशी जुळलेला हा नेता शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने कैवारी आहे. अनेक नेते मंडळी पवारांनी तयार केल्याचे गौरवोदगारही त्यांनी काढले.

शरद पवार हे हाडाचे शेतकरी आहेत. एकेकाळी त्यांचे कुटुंब भाजी विकायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. सोशल मीडिया आवश्यक पण, विश्लेषण करू शकत नाही. ते पुस्तकातूनच होते. वारकरी परंपरा 700 ते 800 वर्षांपूर्वीची आहे. सर्व जातीच्या संतांचा त्यामध्ये समावेश आहे. फुले, शाहू, आंबेडकर ही संकल्पना महत्वपूर्ण आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. आज ज्ञान, विज्ञान, पुस्तके, भक्तीची गरज आहे. नवा समाज घडविण्यासाठी संत आणि महापुरुषांची वाटणी करून चालणार नाही. सर्वांनाच जात मुक्त करूनच पुढे जावे लागेल. एक पुस्तक वाचून चालणार नाही, तर अनेक पुस्तके वाचावी लागणार आहेत. जगाचं कल्याण करण्यासाठी भारताला पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी आशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे सबनिस म्हणाले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. तर, स्वप्नील दुधाने यांनी आभार मानले.

राष्ट्रवादीच्या कार्यक्षम नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी तब्बल 7 वर्षे ग्रंथोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये विविध पुस्तके उपलब्ध करून देण्याचे काम केले. त्याचा वाचकांना लाभ झाला. महिलांसाठी विविध उपक्रम दुधाने यांनी केले. त्यांचे सामाजिक कार्यक्रम महत्वपूर्ण असल्याचे श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.