Lonavala : शहर व ग्रामीण भागात 1400 गरजू नागरिकांना धान्य वाटप

एमपीसी न्यूज : लोणावळा शहर व ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर जाऊन येथिल काही दानशूर व्यक्तींनी लाॅकडाऊन जाहिर झाल्यापासून आजपर्यत सुमारे 1400 गरजू नागरिकांना धान्य वाटप केले आहे. युनिता डाॅल्टन, खुजेमा आरसीवाला, लोहित पुजारी, उषा पंडित, कुणाल रुपारे या पाच जणांनी मानवतेच्या भावनेतून ही मदत केली आहे.

लोणावळा शहर व ग्रामीण पोलीसांच्या सहयोगाने शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागातील वाकसई, करंडोली, मुंढवरे, सदापुर, कार्ला, वेहेरगाव, वेताळनगर, डोंगरगाव, उधेवाडी, ठाकूरवाडी, मंक्कीहिल आदी वस्त्यांवर ही मदत देण्यात आली.

बुधवारी सकाळी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात काही गरजवंत मदतीच्या अपेक्षेने आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांना भेटून त्यांनी त्यांची सुरू असलेली उपासमार सांगितली. कामानिमित्त मध्यप्रदेशातून हे कामगार आले आहे. लाॅकडाऊनमुळे काम बंद झाले. काही दिवसांचा किराणा देऊन ठेकेदार गायब झाला, तो फोन उचलत नाही, घरात खाण्याकरिता काही नाही व धान्य विकत घेण्याकरिता पैसे देखिल नाहीत अशा तिहेरी संकटात सापडेल्या या 24 जणांची माहिती घेत पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी युनिता डाॅल्टन यांच्याशी संपर्क साधला.

त्यावर अवघ्या काही मिनिटात त्या धान्याचे किट घेऊन हजर झाल्या. सहारा पुलाजवळ राहणार्‍या या मजुरांना घरपोच धान्य दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहण्यासारखा होता. पोलीस निरीक्षक मनोज यादव, युनिता डाॅल्टन, लोहित पुजारी, पोलीस नाईक नितेश कवडे, चालक भगवान मोरे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.

दीड महिन्यांपासून गरजवंताना जेवण वाटप

सामाजिक कार्यकर्ते निमेश पारेख व प्रकाश जैन हे दोघे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गरीब मजूर तसेच भिक्षेकरी यांना अन्नदान करत आहे. काहीवेळा पौष्टिक पदार्थ व फळेही वाटप केली जातात. लोणावळ्यातील शेतकरी पुतळा, बाजारपेठ, खंडाळा शनी मंदिर, शांती चौक, कुमार रिसॉर्ट परिसर येथे दुपारच्या वेळी अन्नदान केले जाते. पुढिल दोन महीने हा उपक्रम असाच सुरु ठेवणार असल्याचे पारेख यांनी सांगितले. दररोज दिडशे ते दोनशे गरीब मजूर याचा लाभ घेत असल्याचे पारेख व जैन यांनी सांगितले.

वलवण नांगरगावात भाजीपाला वाटप

वारकरी सांप्रदायातील सुंदराबाई नामदेव इंगूळकर व नगरसेवक सुनिल इंगूळकर यांनी वलवण, नांगरगाव, कालेकर मळा, डेनकर काॅलनी येथे भाजीपाला वाटप केला. यावेळी राजेंद्र चौहान, राजु ढाकोळ, मुकेश परमार हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.