Lonavala : शहरातील बहुप्रतिक्षीत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुल कामाचे भूमीपूजन

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याकरिता अतिशय महत्वाचा असून देखील निधी व तांत्रिक कारणांमुळे पंधरा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या नांगरगाव भांगरवाडी या उड्डाणपुल‍ाच्या कामाचे भूमीपूजन महाराष्ट्राचे राज्यमंत्री बाळा भेगडे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुमारे 20 कोटी रुपयांचे हे काम असून यापैकी साडेनऊ कोटी रुपयांचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून नगरपरिषद व साडेदहा कोटीचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वे विभाग करणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामांकरिता विशेष अनुदान योजनेतून याकामाकरिता नगरपरिषदेला साडेनऊ कोटी रुपयांचा निधी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपलब्ध करुन दिला आहे. यासह साडेसहा कोटी रुपयांच्या निधीतून कैलासनगर येथे गॅस शवदाहिनी व स्मशानभूमी परिसराचे सुशोभिकरण, बाजार भागात शाॅपिंग काॅम्पलेक्स व शहराच्या विविध भागात विजेची भूमिगत केबल टाकणे व स्ट्रिट लाईट ह्या कोट्यावधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, भाजपा गटनेते देविदास कडू, काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, शिवसेना नगरसेवक व शहरप्रमुख सुनिल इंगुळकर, राजु बच्चे, निखिल कविश्वर, बाळासाहेब जाधव, भरत हारपुडे, माणिक मराठे, संजय घोणे, पुजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, सुर्वणा अकोलकर, सुधिर शिर्के, मंदा सोनवणे, दिलीप दामोदरे आदी मान्यवरांसह भाजपाचे मावळातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, लोणावळ्यात सर्व राजकीय पक्ष राजकारण बाजुला ठेऊन विकास कामांना प्राधान्य देत असल्याने लोणावळा शहराचा झपाट्याने विकास सुरु आहे. भविष्यात लोणावळा शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटनस्थळ बनविण्याचा मानस आहे. आशिया खंडातील पहिला झिगझॅग पध्दतीचा सात किमी अंतराचा रोप वे प्रकल्प लोणावळा ते राजमाची दरम्यान होत आहे. साबरमतीच्या धर्तीवर इंद्रायणी सुधार प्रकल्प, रेल्वेच्या जागेत सुसज्ज माॅल, यासह खंडाळा तलावाचे काम व बोटिंग, वलवण धरणात बोटिंग, तुंगार्ली धरण परिसरात पिकनिक पाँईट, कुमार ते मावळा पुतळा दरम्यान रेल्वे पुलाचे रुंदीकरण, कैलासनगर येथून कुसगाव व भुशी धरणाकडे जाणारा रस्ता, इलेक्ट्रिक पार्किंग, एमटीडीसीच्या माध्यमातून शिवाजी उद्यानाचा विकास ही कामे येत्या काळात करण्याचा मानस व्यक्त केला.

लिजच्या जागा जागा मालकांना देण्याचा विचार
स्वातंत्रपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या ज्या जागा व्यापारी बांधवाना तसेच शाळांना देण्यात आल्या आहेत. अशा जागा मूळ जागा मालकांना विनामोबदला देण्याबाबत विचार सुरु असून त्याबाबत नगररचना विभागाचे राज्यमंत्री योगेश सगर यांच्या दालनात बैठक झाली असल्याचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री निधी करिता साडेतीन लाखाचा निधी
कोल्हापुर व सांगली येथील पुरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून लोणावळा नगरपरिषदेच्या सर्व कामगारांनी त्यांचा एक दिवसाचा पगार 3 लाख 38 हजार रुपये हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे सुपुर्द केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like