BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : टाकवे गावात बिबट्याच्या हल्ल्यात बकरी ठार

टाकवे गावावरील बिबट्याचे सावट कायम

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – लोणावळा व कामशेतच्या मध्यावर असलेल्या टाकवे खुर्द या गावात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने धनगराच्या वाड्यावर चाल करत एका बकरीचा फडश्या पाडल्याने टाकवे ग्रामस्तांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिना दिड महिन्यापासून टाकवे गावात बिबट्याचा अधून मधून वावर सुरु असल्याने नागरिक भयभित झाले आहेत. मागील महिन्यात देखिल बिबट्याने याच गावात  धनगराच्या एका घोड्यावर हल्ला करत त्याला ठार मारले होते. बिबट्यापासून या गावात मनुष्यहानी झाली नसली तरी भविष्यात काही संकट उदभवण्यापुर्वी या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी टाकवे ग्रामस्तांनी केली आहे.
डोंगराला लागून असलेल्या टाकवे गावाचा परिसर हा जंगलमय असल्याने या भागात जंगली प्राण्याचा अधिवास पुर्वी पासून आहे मात्र मानवी वस्तीत पुर्वी जंगली प्राणी आले नव्हते, आता मात्र जंगलातील प्राणी मानवी वस्तीलगत दिसू लागल्याने ग्रामस्त भयभित झाले आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गावातील काही युवकांना गावात येताना रस्त्यालगतच्या डोंगरावर बिबट्या दिसला होता, याबाबत ग्रामस्तांनी वन विभागाला माहिती कळविल्यानंतर सदर बिबट्याचा शोध घेण्यात आला मात्र तो मिळून आला नाही. बिबट्याच्या हालचाली टिपण्याकरिता वन विभागाने जंगलात काही ठिकाणी कॅमेरे देखिल लावले होते . असे असताना नागरी वस्तीच्या खालील बाजुला 15 डिसेंबर रोजी बिबट्याने धनगर‍च्या एका घोड्यावर हल्ला करत त्याला ठार मारले होते. त्यानंतर काही दिवस गायब झालेल्या बिबट्याने शुक्रवारी रात्री पुन्हा धनगराच्या बकरी वर हल्ला करत तिला मारल्याने ह्या गावाच्या परिसरात बिबट्याचा अधिवास व वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. बिबट्याने बकरी मारल्याची माहिती समजताच वन विभागाने गावात येथे बकरीची व घटनास्थळाची पाहणी केली. सदर घटनेबाबत बकरी मालकाला नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वन अधिकारी संजय मारणे यांनी सांगितले.
मारणे म्हणाले टाकवे हे गाव डोंगराला व जंगलाला लागून असल्याने या भागात जंगली प्राण्याचा अधिवास आहे व ते शिकारीच्या शोधात असतात, नागरिकांनी आपली जनावरे व प्राणी घरात किंवा गोट्यात बांधल्यास हे जंगली प्राणी शिकारीकरिता इतरत्र जातील. मागील दोन्ही घटना पाहता धनगरवाडे हे डोंगरालगत असल्याने शिकारी करिता बिबट्याने येथे हल्ला केला आहे. इतरवेळी बिबट्या या भागात आलेला नाही. नागरिकांनी देखिल याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे. वनविभागाच्या वतीने ह्या गावात रात्र गस्त सुरु करण्यात येणार आहे, तसेच रात्रीच्या वेळी फटाके वाजत बिबट्या व अन्य जंगली प्राण्यांना गावापासून दूर पळवून लावण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी देखिल सतर्क रहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
HB_POST_END_FTR-A2

.