Chikhali : सहा जनावरे आणि बिबट्या तब्बल तीन तास एकाच परसात

बिबट्याने एकाही जनावराला इजा केली नाही

एमपीसी न्यूज – ‘त्याला राहायला जागाच उरली नाही, म्हणून तो नाईलाजाने ( Chikhali ) आपल्या जागेत आला. आपण त्याची जागा सुरक्षित ठेवली असती तर तो आज आपल्या जागेत आलाच नसता.’ या भावना आहेत, आश्रम रोड, चिखली येथील सुदाम मोरे यांच्या. सुदाम मोरे यांच्या बंगल्याच्या परसात त्यांची जनावरे बांधलेली असतात. तिथेच आज एक बिबट्या आला आणि तो तब्बल तीन तास थांबला. अखेर त्याला वन विभागाने जेरबंद केले.

 

गुरुवारी (दि. 28) पहाटे पाच वाजताच्या सुमारास एक बिबट्या देहू-आळंदी मार्गावरील कुदळवाडी परिसरात आढळला. परिसरातील मोकाट कुत्र्यांनी भुंकून भुंकून बिबट्याला जेरीस आणले. शेवटी आपला जीव वाचवण्यासाठी बिबट्या इकडून तिकडे सैरावैरा पळू लागला. आश्रम रोड, चिखली येथे सुदाम मोरे आणि त्यांच्या चारही भावांचे शेजारी शेजारी आलिशान बंगले आहेत. बंगल्यांना त्यांनी भिंतीचे कुंपण केले आहे.

 

Wagholi : मद्यधुंद दुचाकीस्वाराची दुसऱ्या दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

 

कुत्र्यांच्या भीतीने बिबट्याने मोरे यांच्या बंगल्याच्या कुंपणावरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर सर्व मोकाट कुत्री मोरे यांच्या बंगल्याच्या गेटवर जमा झाली. कुत्र्यांच्या भुंकण्याचा एकसारखा आवाज ऐकल्याने सुदाम मोरे यांच्याकडे काम करणारा एक कामगार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उठला आणि पाहणी केली. तर बंगल्याच्या आवारात चक्क एक बिबट्या आला असल्याचे कामगाराला दिसले.

 

बिबट्याला पाहून कामगाराची पाचावर धारण बसली. त्याने सुदाम मोरे यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली होती. आपल्या परिसरात बिबट्या आला असल्याची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

सकाळी वन विभागाचे एक पथक दाखल झाले. त्यावेळी बिबट्या आणि मोरे कुटुंबियांची सहा जनावरे एकाच परसात होती. बिबट्याने एकाही जनावराला इजा केली नाही. एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत बिबट्याने शेजारी असलेल्या मोरे यांच्या शेतात धाव घेतली. ज्वारीच्या शेतात पसार झालेल्या बिबट्याला वन विभागाने तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर पकडले.

 

याबाबत सुदाम मोरे सांगतात की, बिबट्या त्याचा जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे पळत होता. त्याने कुणालाही इजा केली नाही. आमच्या घरासमोर बांधलेल्या जनावरांना देखील त्याने काही केले नाही.’

 

‘आपण जंगलतोड केली. त्यामुळे जंगली प्राण्यांना राहायला जागाच उरली नाही. म्हणून ते प्राणी आता मानवी वस्तीत दाखल होत आहेत. जीव वाचवून जगण्याची धडपड ते प्राणी करीत आहेत. आपण त्यांचे जंगल, नैसर्गिक अधिवास सुरक्षित केले पाहिजेत, असेही सुदाम मोरे यांनी ( Chikhali ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.