Lonavala : पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात व गुलाल, भंडारा, फुले यांची उधळण करत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. अतिशय शांततामय वातावरणात सात तास लोणावळा शहरात हा विसर्जन मिरवणुकीचा सोहळा सुरु होता. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. जोरदार कोसळणार्‍या पावसाचा कसलाही परिणाम कार्यकर्त्यांच्या उत्साहावर झाला नाही, जोशपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली.

सायंकाळी पाच वाजता मावळा पुतळा चौकात नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनित कावत, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या हस्ते बाप्पांचे पुजन करत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. काही वेळांच्या अंतराने मानाचे पहिले पाच गणपती मावळ पुतळा चौकात दाखल झाले. तदनंतर नंबर प्रमाणे मानाचे सर्व 26 बाप्पा चौकात आले. ढोल ताशे व लेझिम या पारंपारिक वाद्यांच्या निनादात बाप्पांची भव्य मिरवणुक सुरु होती. बहुतांश मंडळांचे स्वतःचे ढोल लेझिम असल्याने कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने खेळ सादर करत नाचत होते. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात मिरवणुक सुरु होती. मावळा पुतळा चौक, जयचंद चौक, शिवाजी महाराज चौक व विजया बँकेसमोरील चौकात ढोल ताश्या पथकांनी खेळ सादर केले.

गणेश भक्तांकरिता लोणावळा खंडाळा लायन्स क्लबच्या वतीने चहा, बाबा रामदेव भक्त मंडळाच्या वतीने भेळ, जयचंद चौकात लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने महाप्रसाद (पुलाव भात), मावळ वार्ता फाऊंडेशन व सत्यनारायण कमिटीच्या वतीने चहा वाटप करण्यात आले. लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, भाजपा लोणावळा शहर, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना व मावळ वार्ता फाऊंडेशन यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारत सर्व गणेश मंडळे व ढोल ताशा पथकांचे स्वागत करण्यात आले.

मिरवणुकीपुर्वी शहर पोलिसांच्या वतीने रुट मार्च करण्यात आला होता. इंद्रायणी नदी, नगरपरिषदेचा विसर्जन हौद, लोणावळा धरण, तुंगार्ली हौद व वलवण तलाव या वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. रात्री पावणेबारा वाजता शिवाजी महाराज चौकातून शेवटचे बाप्पा घाटाकडे मार्गस्थ झाले तर साडेबारा वाजता सर्व गणपती विसर्जित झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.